किल्ले रायगडावर शिवप्रेमींचे तुफान; ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

किल्ले रायगडावर शिवप्रेमींचे तुफान; ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
किल्ले रायगडावर शिवप्रेमींचे तुफान; ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
किल्ले रायगडावर शिवप्रेमींचे तुफान; ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
किल्ले रायगडावर शिवप्रेमींचे तुफान; ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
किल्ले रायगडावर शिवप्रेमींचे तुफान; ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

महाड (प्रतिनिधी) :

जगाला आदर्शवत ठरलेल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहोळा मोठ्या उत्साहात शिवरायांच्या जयघोषात शिवतीर्थ किल्ले रायगडावर गुरुवारी संपन्न झाला. यावेळी रायगडावर शिवप्रेमींचे तुफान आले होते. याप्रसंगी राजसदरेवरून उपस्थित हजारो शिवप्रेमींना संबोधित करताना खासदार संभाजीराजे यांनी शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचे पैलू उलगडून सांगत शिवाजी महाराजांची नीतिमत्ता आणि राजकारभाराच्या धोरणानुसार राज्य सरकारने कारभार करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे या मताचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

या सोहोळ्यासाठी चीनचे राजदूत लीयू बिन्ग, पोलंडचे राजदूत दमियन इरज्याक, सचिव इवा स्टेन्किइव्हीक्झ, टूनिसियाचे राजदूत नेज्मेद्दिन लखाल, बुलग्रीयाचे राजदूत इलेनोरा दिम्तीवा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी अनिल पारस्कर, तहसीलदार चंद्रसेन पवार, कोल्हापुरचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रायगडावर करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेत संभाजीराजे पुढे म्हणाले की, रायगडावर पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल. येथे पुरेशी पाणीव्यवस्था केली जाईल. शिल्लक पाणी रायगड परिसरातील २१ गावांना पुरविण्यात येईल. आतापर्यंत गडकिल्ल्यांसाठी काम करत आलो आहे, यापुढे शेतकऱ्यांसाठी, बहुजनांसाठी काम करेन. गड-किल्ल्यांचे बिझनेस माँडेल बनविले असून ते लवकरच केंद्र शासनाला सादर केले जाईल. शासनाने बुलेट ट्रेन प्रमाणेच या प्रकल्पाला भरघोस निधी द्यावा, तसेच किल्ले संवर्धन विभागाला स्वतंत्र मंत्री खाते म्हणून मंजुरी दिली जावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावेळी चीनचे राजदूत लीयू बिन्ग यांनी सोहोळ्याला शुभेच्छा देताना छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे नव्हे तर चीनचेही आदर्श असल्याचे सांगितले.

सदर सोहळ्याप्रसंगी रयतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचट या शेतक-यांच्या कुटूंबाला राजसदरेवर उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली. या  शेतक-यांच्या कुटूंबियाच्या हस्ते पूजन झाले. त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला. 

तत्पूर्वी सकाळी सात वाजता ध्वजपूजन व ध्वजारोहण झाले. यानंतर शाहिर रंगराव पाटिल, आझाद नायकवडी यांनी पोवाडे गायले. साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. खासदार संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर जगदीश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पालखी सोहळ्याचा समारोप झाला.  यावेळी खा. संभाजीराजे यांच्या हस्ते समाधीस्थळ येथे पुष्पहार अर्पण करण्यात आला. या सोहोळ्यासाठी लाखो शिवप्रेमींनी रायगडावर हजेरी लावली. याचवेळी पाचाड येथील राजमाता जिजामाता यांच्या समाधीचेही शिवप्रेमींनी दर्शन घेतले. शिवराज्याभिषेक दिन सोहोळ्याच्या नीटनेटक्या नियोजनासाठी विविध समित्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी करण्यात आली होती.