केडीएमसीला १०० कोटी देणार- उध्‍दव ठाकरे

केडीएमसीला १०० कोटी देणार- उध्‍दव ठाकरे

कल्‍याण (प्रतिनिधी) : 
कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) प्राधान्‍याने महापालिकेच्‍या प्रकल्‍पांबाबत अहवाल सादर केल्‍यास त्‍यांस रु. १०० कोटी निधी स्‍वरुपात दिले जातील, असे आश्‍वासन मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांच्या दालनात संपन्‍न झालेल्‍या बैठकीत दिले. त्‍याचप्रमाणे यापुढेही महापालिकेच्‍या अहवाल सादरीकरणानंतर शहरासाठी आवश्‍यक त्‍या परवानग्‍या व निधी दिला जाईल, असेही आश्‍वासन मुख्‍यमंत्री उध्‍दवजी ठाकरे यांनी दिले.

महापालिकेने शहर स्‍वच्‍छता, वाहतूक बेटे, रस्‍त्‍यांचे कॉक्रिटीकरण न करता रस्‍ते मिलींग अॅण्‍ड फिनीशिंग पध्‍दतीने बनविणे, दुभाजकांची व्‍यवस्‍था करणे, फेरीवाला हटाव मोहिम राबविणे, रस्‍त्‍यावरील बेवारस वाहने हालविणेबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश त्‍यांनी महापालिका आयुक्‍त गोविंद बोडके यांना दिले.

डोंबिवली एमआयडीसीमधील घातक कारखान्‍यांबाबत तीन टप्‍यात कार्यवाही करणेबाबतचे निर्देश एमआयडीसीचे अधिकारी व पोल्‍यूशन कंट्रोल बोर्डाचे सदस्‍य सचिव ई. रवींद्रन यांना दिले. यामध्‍ये कारखान्‍यात सुरक्षा उपकरणे लावणे, पाईप लाईनची दुरुस्‍ती करणे, घातक कारखान्‍यांना नागरी वस्‍तीपासून टप्‍या-टप्‍याने स्‍थलांतरीत करण्‍यासाठी १५ दिवसात सर्व्‍हेक्षण करुन अहवाल सादर करणेबाबतची कार्यवाही करावी, असेही निर्देश त्‍यांनी यावेळी संबंधित अधिका-यांना दिले.

सदर बैठकीस पर्यावरणमंत्री आदित्‍य ठाकरे, ठाणे जिल्‍हा पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, प्रधान सचिव, नगर विकास मनिषा म्‍हैसकर, मुख्‍य सचिव अजोय मेहता, महापालिकेच्या महापौर विनिता राणे, कल्‍याणचे आमदार विश्‍वनाथ भोईर, आमदार डॉ. जगन्नाथ शिंदे, आमदार रविंद्र फाटक, जिल्‍हाधिकारी राजेश नार्वेकर, विभागीय आयुक्‍त दौंड, पर्यावरण व प्रदुषण मंडळाचे सचिव ई. रविंद्रन व इतर मान्‍यवर उपस्थित होते.