केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना १५ हजारांची दिवाळी भेट

केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना १५ हजारांची दिवाळी भेट

कल्याण (प्रतिनिधी) : ठाणे महापालिके पाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही आपल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी रु.१५ हजार सानुग्रह अनुदान जाहीर करीत दिवाळी भेट दिली आहे.

गतवर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी रु.१५ हजार सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. तसेच या महिन्याच्या पगारात महागाई भत्त्याचा फरक ११ टक्के रोखीने देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करीत आयुक्त सूर्यवंशी यांनी यंदा वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी वर्ग वगळून वर्ग-३ आणि वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांना रु. १५ हजार सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे.

सदर सानुग्रह अनुदानाचा लाभ महापालिकेतील व शिक्षण मंडळातील सुमारे ५३४२ स्थायी-अस्थायी, कंत्राटी  कर्मचाऱ्यांना होणार आहे. या दिवाळी भेटीमुळे कर्मचारीवर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे. महानगर सफाई कर्मचारी संघाचे प्रदेश अध्यक्ष भारत गायकवाड यांनी याबद्दल महापालिका आयुक्तांचे आभार मानले आहेत.