कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली

कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली

कल्याण (प्रतिनिधी) : शनिवारी कल्याण तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये एकुण ७६२४ दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटूंबिक वाद प्रकरणे, चेक संबधीची फौजदारी प्रकरणे, बॅक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वीजबीलासंदर्भातील प्रकरणे तसेच न्यायालयात वाद दाखलपुर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. यापैकी एकुण १९५१ दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आले असुन त्यात एकुण रु. ६,२१,८१,०१३/- ची रक्कम नुकसान भरपाई, वीज बिल वसुली, बँकांची ऋण वसुली इत्यादी म्हणून संबधीतास अदा करण्यात आलेली आहे.

या लोकन्यायालयात मोठया संख्येने पक्षकार, अधिकारी, इन्सुरन्स कंपन्याचे अधिकारी, वाहतुक शाखेचे अधिकारी व वीज वितरण कंपनीचे अधिकारी हजर होते. वीजबिल बाबतच्या एका फौजदारी प्रकरणात ४ हजार ६०० रुपये  भरणे आवश्यक होते. परंतु या प्रकरणातील पक्षकार स्त्री ही गरीब असल्यामुळे तिच्याकडे फक्त रक्कम ३ हजार ५०० रुपये होते. उर्वरित रक्कम जिल्हा न्यायाधीश राजीव पांडे, शिवाजी कचरे, वीज वितरण कंपनी अधिक्षक अभियंता डी आर पाटील व दिलीप भोळे व वकील महेश बोरूडे यांनी अदा केल्यामुळे सदर प्रकरण निकाली काढण्यात आले.

हे लोकन्यायालय यशस्वी केल्याबद्दल जिल्हा न्यायाधीश - १ तथा कल्याण तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष राजीव पी. पांडे यांनी सर्व पक्षकार, लोकन्यायालयात सहभागी झालेले वीज वितरण, इन्शुरन्स, बॅक वाहतुक शाखेचे अधिकारी, न्यायीक अधिकारी, विधीज्ञ व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.