२१ वर्षांनंतर बारवी धरणग्रस्तांचा प्रश्न सुटला – किसन कथोरे

२१ वर्षांनंतर बारवी धरणग्रस्तांचा प्रश्न सुटला – किसन कथोरे

कल्याण (प्रतिनिधी) :
अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरणग्रस्तांचा सुमारे २१ वर्षांपासून रेंगाळत असलेला प्रश्न अखेर मिटला असल्याची माहिती मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी आज दिली.

औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता कालिदास भांडेवार व कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी आज मुरबाड येथील शासकीय विश्रामगृहात आमदार कथोरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. धरणग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे यासाठी कथोरे हे सातत्याने प्रयत्नशील होते. भांडेवारव चव्हाण यांनी नंतर अधिक माहिती दिली. बारवी धरणाची उंची वाढवल्यामुळे तोंडली व अन्य पाच गावातील १२०४ गावकरी धरणग्रस्त झाले होते. त्यांना त्यांच्या निवडीनुसार प्रत्येकी दोन गावठाणाच्या जमिनी पुनर्वसनासाठी देण्यात आल्या आहेत.

धरणाची उंची वाढल्यामुळे आता २३४ द.ल.ली. ऐवजी पाणी साठवण्याची क्षमता ३४०.४८ द.ल.ली. इतकी वाढणार आहे. या वाढीव क्षमतेमुळे ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्न सुटेल असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.