मराठा सेवा संघाच्या ३० वा वर्धापन दिन राज्यभर साजरा

मराठा सेवा संघाच्या ३० वा वर्धापन दिन राज्यभर साजरा

ठाणे (प्रतिनिधी) : मराठा सेवा संघाच्या (मसेसं) ३० व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी मुंबई-ठाण्यासह राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच निमित्ताने मसेसंच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा मागोवा घेणाऱ्या अकरा दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचेही यानिमित्ताने आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे पूर्व येथील मराठा सेवा संघाच्या शहर कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे, उपाध्यक्ष जगन्नाथ केदार, ठाणे शहर अध्यक्ष संतोष मोरे, सचिव सुधीर भोसले, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रतिभा शिर्के, रोहिणी मोरे कांता गजमल, अनिता मोठे यावेळी मसेसं प्रणित वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी शुभम कवे यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश मसेसंच्या वतीने दहा दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमाले अंतर्गत- मराठा सेवा संघ- विचार, वाटचाल व पंचसूत्री यावर गंगाधर बनबरे यांचे मंगळवारी पहिले व्याख्यान संपन्न झाले. पुढील दहा दिवस दररोज दोन अशी व्याख्याने होणार आहेत. मसेसं व परिवर्तनवादी चळवळींचा समन्वय यावर डॉ. प्रदीप आगलावे, मसेसं आणि मुस्लीम समाज यावर डॉ. सय्यद रफिक, मसेसं आणि धार्मिक परिवर्तन यावर प्रख्यात विचारवंत डॉ. प्रभाकर पावडे, मसेसं आणि इतिहासाचे पुनर्लेखन यावर इतिहासाचार्य मा.म. देशमुख, मसेसं आणि शैक्षणिक बदल यावर माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, मराठा सेवा संघाचा प्रसारमाध्यमांवरील प्रभाव यावर गणेश हलकारे, मसेसं आणि सामाजिक सलोखा यावर निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, मसेसं आणि बहुजन समाज यावर ज्ञानेश वाकुडकर, मसेसं व भारताबाहेरील कार्य यावर इंजि. राहुल चन्ने, इंजि. स्वप्नील खेडेकर, मसेसं आणि महाराष्ट्रा बाहेरील कार्य यावर कमलेश पाटील, मसेसंने प्रशासकीय क्षेत्रात आणलेला बदल इंजि. सचिन चौधरी, मसेसं आणि महिला प्रबोधन यावर क्षिप्रा मानकर, मसेसं व ओबीसी चळवळ यावर प्रदीप ढोबळे, मसेसं व राजकीय क्षेत्रातील सहभाग व प्रभाव यावर ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे, मसेसं आणि मराठा आरक्षण यावर विधिज्ञ आशीष गायकवाड, मसेसं आणि साहित्य लेखन यावर साहेबराव खंदारे, मसेसं व वैदिक ब्राह्मणी व्यवस्था यावर कॉ. धनाजी गुरव, मसेसंचा समाज जीवनावर झालेला परिणाम यावर डॉ. भारत पाटणकर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

सदर व्याख्यानमालेचा समारोप मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहे. ही व्याख्यानमाला मसेसंच्या फेसबुक पेजवरून प्रसारित होणार आहे. तसेच राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा घडवून आणून त्या मान्य करण्याच्या अनुषंगाने वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यभरात ठिकठिकाणी मसेसं प्रणित संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाच्या वतीने सर्वच जिल्हाधिकारी, तसेच तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली.