महावितरणच्या मेळाव्याचा ३१ बेरोजगार अभियंत्यांनी घेतला लाभ

महावितरणच्या मेळाव्याचा ३१ बेरोजगार अभियंत्यांनी घेतला लाभ

कल्याण (प्रतिनिधी) : विद्युत विभागाशी संबंधित कामाचे ठेके पात्र अभियंत्यांना उपलब्ध होऊन त्यांना रोजगार उपलब्ध व्हावे याकरता उर्जा विभाग व महावितरण यांच्यामार्फत आयोजीत मेळाव्याचा ३१ अभियंत्यांनी लाभ घेतला. तर सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या दोन पात्र अभियंत्यांना कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांच्या हस्ते महावितरणच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले. हा मेळावा महावितरणच्या कल्याण येथील 'तेजश्री' मुख्य अभियंता कार्यालय सभागृहात नुकताच संपन्न झाला.

यावेळी गरजू व पात्र अभियंत्यांनी  महावितरणच्या कामाचे ठेके घेतल्यास महावितरणच्या कामात अधिक गुणात्मक बदल होऊ शकतो. याचबरोबर बेरोजगार अभियंत्यांना स्वतःच्या रोजगारासोबतच इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी यातून मिळू शकते, असे मत कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी व्यक्त केले.

तत्पूर्वी मेळाव्याच्या सुरवातीस कल्याण सर्कल-१ चे अधीक्षक अभियंता सुनील काकडे व कल्याण सर्कल-२ चे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी उपस्थित बेरोजगार अभियंत्यांना लायसन संबंधित सर्व नियम, कायदे याबाबत माहिती दिली. विद्युत निरीक्षक अर्जुन जाधव यांनी पीडब्ल्यूडी लायसन, सुपरवायझर लायसन, ठेकेदारीचे लायसन काढण्यासंबंधी आवश्यक ती सर्व माहिती दिली. यामध्ये अर्ज कसा करावा, कोठे करावा, तो अर्ज कोणत्या टप्प्यातून जातो याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, काशिनाथ बेल्ले, दिगंबर राठोड, रामराव राठोड तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.