मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत

मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत

पालघर (प्रतिनिधी) : 
वाडा तालुक्यातील छत्रपती विद्यालय, साखरे येथील विद्यार्थी शाळेत जात असताना नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना शासनाकडून आर्थिक मदत म्हणून वाडा उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चार लाखाचा धनादेश दिला.

मागील आठवड्यात जोरदार पाऊस सुरू असताना शुक्रवार, दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० च्या सुमारास छत्रपती विद्यालय साखरे येथील विद्यार्थी सिताराम शिवराम चौधरी (वय १६ वर्षे, रा. मु. खुडेद पैकी कुंडाचापाडा) हा शाळेतून घरी जात असतांना देहर्जे नदीच्या पुरात वाहून गेला होता. दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास देहर्जे नदीच्या पात्रात सखाराम चौधरी यांच्या शेत जमिनीजवळ करवंदीच्या झाडात अडकलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. सदरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे करण्यात येऊन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला होता. सदर मयताचे कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन शासनाकडून रक्कम ४ लाख रुपये रकमेचा धनादेश वाडाचे उपविभागीय अधिकारी अर्चना कदम यांनी दिला.