कल्याणमधील १०० फुटी रस्त्यात बाधित ४२ बांधकामे निष्कासित

कल्याणमधील १०० फुटी रस्त्यात बाधित ४२ बांधकामे निष्कासित

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पूर्वेतील मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंत ३० मीटर (१०० फुट) रस्त्यात बाधित होणारी ४२ बांधकामे महापालिकेमार्फत बुधवारी निष्कासित करण्यात आली. बाधितांनी सहकार्य केल्याने ही कारवाई सुरळीत पार पडली.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त (ड प्रभाग) अनंत कदम यांचे मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसरातील मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंत ३० मीटर रस्त्यात बाधित होणारी बांधकामे निष्कासित करण्याची धडक कारवाई काल ‘ड’ प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, उपअभियंता प्रशांत भुजबळ यांनी अतिक्रमण विरोधी पथकामार्फत पोलीस पथकाच्या सहकार्याने केली. सदर कारवाईत रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी एकुण ४२ बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदर रस्त्याची लांबी २.४ किमी असून रुंदी ३० मीटर (१०० फूट) आहे. ही कारवाई करतांना बाधित बांधकामधारकांनी सहकार्य केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे भोंगाडे यांनी सांगितले.

सदर रस्ता पूना-लिंक रस्त्याला समांतर रस्ता आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पूना-लिंक रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन पर्यायाने वाहतुक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या ‘इ’ प्रभागातील पिसवली परिसरातही प्रभागक्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी आय प्रभागातील अतिक्रमणविरोधी पथक व पोलिस पथकाच्या सहाय्याने काल दिवस भरात १० बांधीव जोते व ८ चाळ रुम निष्कासित करण्याची कारवाई केली.