टिटवाळा येथील ५०० नागरिकांनी घेतला रेशनकार्ड शिबिराचा लाभ

टिटवाळा येथील ५०० नागरिकांनी घेतला रेशनकार्ड शिबिराचा लाभ

टिटवाळा (प्रतिनिधी) : येथील बल्याणी प्रभागातील नागरिकांसाठी स्थानिक शिवसेना नगरसेविका नमिता मयूर पाटील व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील यांनी रेशनकार्ड शिबीराचे नुकतेच आयोजन केले होते. या शिबिराचा सुमारे ५०० नागरिकांनी लाभ घेतला.

बल्याणी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या शिबिरात नवीन रेशनकार्ड, रेशनकार्डमध्ये दुरुस्ती, दुय्यम रेशनकार्ड, पत्ता दुरुस्ती, नवीन नावे समाविष्ट करणे इत्यादी कामे करून देण्यात आली. दिवसभरात सुमारे ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी शिबिरात येऊन त्यांची रेशनकार्डची कामे करून घेतली.

शिबिराबाबत माहिती देताना निमंत्रक मयूर पाटील यांनी सांगितले की, बल्याणी व परिसरात अनेक नागरिक बाहेरून नव्याने येऊन स्थायिक झाले असून त्यांना व इतर नागरिकांना रेशनकार्डची विविध कामे करण्यासाठी कल्याण येथील शिधावाटप कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागतात. त्यात त्यांना अनेक अडचणी येत होत्या. यासाठी कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातच रेशनकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना जेथल्या तेथे संपूर्ण माहिती देऊन तत्काळ त्यांची नवीन रेशनकार्ड, रेशनकार्डमध्ये दुरुस्ती, दुय्यम रेशनकार्ड, पत्ता दुरुस्ती, नवीन नावे समाविष्ट करणे अशी कामे करून देण्यात आली.