धावत्या उद्यान एक्स्प्रेस समोरील ६ सेकंदांचा थरार! मयूर शेळकेवर कौतुकाचा वर्षाव! 

धावत्या उद्यान एक्स्प्रेस समोरील ६ सेकंदांचा थरार! मयूर शेळकेवर कौतुकाचा वर्षाव! 

वांगणी (प्रतिनिधी) : फलाटावरून रेल्वे मार्गात पडलेल्या लहानगा... समोरून वेगाने येणारी उद्यान एक्सप्रेस... अवघा सहा सेकंदांचा थरार... विचार करायला क्षणही नव्हता.... अशा परिस्थितीत सुमारे शंभर मीटर अंतरावर असलेला रेल्वेचा पॉईंटमन सर्व शक्ती एकवटून त्या लहानग्याला वाचविण्यासाठी धावला. मयूर सखाराम शेळके याच्यावर आज संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

शनिवारी साडेसहाच्या सुमारास बदलापूर जवळील  वांगणी रेल्वे स्थानकात फलाटा वरून एक अंध महिला आपल्या लहान मुलाला हाताला धरून घेऊन जात असताना तिचे मुल रेल्वेमार्गावर पडले. त्याचेवेळी कर्जतकडून वेगाने उद्यान एक्स्प्रेस वांगणी स्थानकाच्या दिशेने येत होती. अंध असलेली आई चाचपडत मुलाला हात देण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. अवघ्या सहा सेकंदावर आलेली उद्यान एक्स्प्रेस. ही घटना प्रत्यक्ष पाहणारे आता काय होणार या क्षणभरच्या जाणिवेनेच हळहळत होते. आणि त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक तरुण रेल्वेमार्गातून तुफान वेगाने त्या लहानग्याच्या दिशेने धावला. काही फुटांवर मृत्युच्या रुपात उद्यान एक्स्प्रेस आलेली..., मात्र त्या तरुणाने हिंमतीने लहानग्याला फलाटावर उचलून ठेवत स्वत:ही फलाटावर चढण्यात यशस्वी झाला. आज ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ त्या तरुणाचे ... मयूर शेळके याचेच नाव ऐकायला मिळत आहे. रेल्वेत पॉईंटमन असलेला मयूर त्यावेळी ड्युटीवर होता. 

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मयूरला मोबाईलवर संपर्क साधत त्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे. रेल्वे प्रशासनाने मयूरच्या साहसाची-हिंमतीची दखल घेत त्याचा मुंबई येथील डीआरएम कार्यालयात सत्कार केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमदार राजू पाटील यांनी तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख एकनाथ शेलार यांनीही मयूर शेळके याचा सत्कार केला आहे. रेल्वे संघटनांकडूनही ठिकठिकाणी मयूरचा सत्कार करण्यात आला. वांगणी रेल्वे प्रवासी संघटना आणि बदलापूर शहर प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांनीही मयूरचे कौतुक करीत त्याच्या या दुर्दम्य साहसाबद्दल त्याला रेल्वेचा सर्वोच्च पुरस्कार व राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची मागणी भारत सरकार व रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.