शेती पिकासाठी ८ हजार तर फळबागासाठी १८ हजार प्रती हेक्टर मदत जाहीर

शेती पिकासाठी ८ हजार तर फळबागासाठी १८ हजार प्रती हेक्टर मदत जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : 
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रिवादळामुळे तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३२५ तालुक्यांमधील खरीप शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून शेतीपिकासाठी प्रती हेक्टर ८ हजार आणि फळबागासाठी १८ हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याशिवाय जमीन महसुलात सूट आणि शेतीपिकांच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.

शेती, फळपिकांच्या नुकसानीकरीता ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. ही मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा झालेल्या रक्कमेतून बॅंकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करु नये, असे आदेश संबंधित बँकांना देण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.