नाडसुर ग्रामपंचायतीची ८ गाव स्मशानभूमी शेडपासून वंचित

नाडसुर ग्रामपंचायतीची ८ गाव स्मशानभूमी शेडपासून वंचित

पाली-सुधागड (प्रतिनिधी) :
सुधागड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नाडसुर ग्रामपंचायतीची ओळख असूनही गावाला अनेक समस्या भेडसावत आहेत. धोंडसे, वैतागवाडी, बहिरमपाडा, नाडसूर, दोन बौद्ध वाड्या, दोन आदिवासी वाड्या असलेल्या नाडसुर गावातील स्मशानभूमीला शेड नसल्याने गावातील एखादी व्यक्ती मृत पावल्यास तिचा अंत्यसंस्कार करतेवेळी पावसामुळे ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत लागत आहे. 

देश स्वतंत्र होऊन ७१ वर्ष झाली. मात्र यातील अनेक गावे विकासापासून वंचित आहेत. लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या वेळी घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागत  असतात. त्यावेळी विकासासंदर्भात देवाची  खोटी शपथ घेऊन शब्द देतात, मात्र निवडून आल्यानंतर पाठ फिरवतात. आजवर अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या पुढाऱ्यांनी फक्त आश्वासनेच दिली. देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी शासन धोरणे आखली, परंतु आजतागायत पुरेशी अमलात आली नाही. 

शासन प्रत्येक गावातील वीज, पाणी, रस्ता, स्मशानभूमी या मूलभूत गरजेवर कोट्यावधी खर्च करते. तरीही ग्रामीण भागात आजही या समस्यांचा बोजवारा उडालेला दिसत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप, शिवसेना पक्ष बहुमतांनी विजयी होऊन सत्तेचा दरबार भरवला आहे. विद्यमान सरकारने ग्रामीण भागात लक्ष द्यावे, अशा प्रतिक्रिया नाडसूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. याप्रकरणी येथील ग्रामस्थ भगवान शिंदे म्हणाले की, नाडसूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अनेकवेळा स्मशानभूमीच्या शेड संदर्भात सूचना केली, मात्र माजी  सरपंच व आजी सरपंच यांनी दखल घेण्याचे आश्वासन देऊनही परीस्थिती अद्यापि ‘जैसे थे’ आहे.