महाविकास आघाडीत कल्याणमध्ये बिघाडी

महाविकास आघाडीत कल्याणमध्ये बिघाडी

कल्याण (प्रतिनिधी) :
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली. मात्र असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस सदस्यासह मनसेच्या सदस्यांने भाजपच्या विकास म्हात्रे यांना मतदान केल्याने ते सभापतीपदी निवडून आले. 

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागलेला पाहायला मिळाला. भाजपने शिवसेनेला धोबीपछाड देत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. भाजपचा हा विजय एकप्रकारे सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदांसाठी आज निवडणूक होणार होती. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेचे गणेश कोट तर भाजपकडून गटनेते विकास म्हात्रे यांनी अर्ज दाखल केला. राज्यातील राजकीय स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. १६ सदस्य असणाऱ्या स्थायी समितीमध्ये ८  सदस्य शिवसेनेचे, ६ भाजपचे तर मनसे-काँग्रेसचे प्रत्येकी १ सदस्य आहेत. सदस्य संख्येचा विचार करता शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र शिवसेना सदस्य वामन म्हात्रे प्रकृतीच्या कारणामुळे निवडणुकीला गैरहजर राहण्याची चिन्हे दिसू लागल्याने सेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. दुसरीकडे अचानक कॉंग्रेस आणि मनसेच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले. तरीही महाविकास आघाडी असल्याने काँग्रेस सदस्याचे मत शिवसेनेला जाणार असल्याची चर्चा होती.

निवडणुकीला अपेक्षेप्रमाणे सेना सदस्य वामन म्हात्रे अनुपस्थित राहिले. प्रत्यक्ष मतदाना वेळी मनसे आणि काँग्रेस सदस्यांनी भाजपच्या बाजूने मतदान करीत विकास म्हात्रे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बहुमताचे  संख्याबळ असूनही पराभव झाल्याने हा पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. 

भाजपच्या या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना आ. रविंद्र चव्हाण यांनी म्हणाले की, शिवसेनेशी आम्ही सातत्याने संपर्कात होतो. परंतु त्यांच्याकडून आम्हाला दिलेला शब्द पाळण्यात आला नाही. त्यामूळे आम्ही विकास म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि हा सत्याचा विजय असून येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या निवडणुकीत अनुपस्थित राहिलेल्या वामन म्हात्रे यांच्यावर पक्ष कारवाई करणार असल्याचे सेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले.

दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या वीणा गणेश जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.