नागरिकाच्या तक्रारीने केडीएमसीच्या नगररचना विभागातील भ्रष्टाचाराकडे अंगुलीनिर्देश

नागरिकाच्या तक्रारीने केडीएमसीच्या नगररचना विभागातील भ्रष्टाचाराकडे अंगुलीनिर्देश

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर गंभीर आरोप करीत त्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे शहरातील एका नागरिकाने लेखी तक्रार केली आहे. यापूर्वी शहरातील एका मोठ्या गृहसंकुलातील नियमबाह्य बांधकामांच्या तक्रारी करण्यात येऊनही त्यावर कारवाई होत नसल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यातच या तक्रारीने महापालिकेच्या नगररचना विभागातील भ्रष्टाचाराकडे ‘अंगुलीनिर्देश’ केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.

नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर आडके यांच्याकडे ‘ग’ प्रभाग क्षेत्र असतानाही त्याने ‘फ’ व कल्याण पूर्वेतील बांधकाम परवानग्या दिल्याचा गंभीर आरोप कल्याण पूर्वेतील एक नागरिक विनोद नरे यांनी महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत केली आहे. बांधकाम परवानगी देताना फुटाचा दर लावला जात असल्याचे देखील आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाक राहिला नसल्याने कनिष्ठ अधिकारी नियमबाह्य कामे करीत असल्याचेही सदर तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकरणांची चौकशी करून सबंधित कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी नरे यांनी केली आहे.