टिटवाळ्याजवळ वन जमिनीवर बहरतेय वनराई

टिटवाळ्याजवळ वन जमिनीवर बहरतेय वनराई

कल्याण (प्रतिनिधी) : टिटवाळा जवळच असलेल्या उंभार्ली येथे वन खात्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणावर पावणेतीन वर्षांपूर्वी वन विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी निष्कासनाची कारवाई केली होती. त्याच सुमारे १० एकर जमिनीवर वन विभागाने २०१९ पासून आतापर्यत ८८०० रोपांची लागवड करीत तेथे वनराई फुलविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे भविष्यात येथे दाट वनराई बहरलेली निसर्गप्रेमी नागरिकांना पाहायला मिळणार आहे. 

वन विभागाच्या जमिनी मोकळ्या पडून राहिल्या की तेथे भूमाफियांकडून अतिक्रमण केले जाते. हीच बाब लक्षात घेऊन कारवाई केलेल्या या जागेवर वनवाई फुलवण्याचा निर्णय कल्याण तालुक्याच्या वनक्षेत्रपाल कल्पना वाघेरे यांनी दोन वर्षांपूर्वी घेतला. त्याप्रमाणे त्यांनी ठाणे जिल्हा वन विभागाचे वनउपरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जमिनीवर वनराई उभारण्याच्या दृष्टीने आतापर्यत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली. या उपक्रमात तब्बल ८८०० रोपे लागवड करण्यात आल्याची माहिती कल्पना वाघेरे यांनी दिली आहे. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, या अतिक्रमित जमिनीवरील अतिक्रमण काढल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये असा हेतू होता. त्यादृष्टीने दोन वर्षांपासून सदर जमिनीवर वृक्षलागवड करण्यात आली. यामध्ये शिसम, आवळा, साग, मोहा, सीताफळ, काजू, बांबू अशी अनेक प्रकारची रोपे लावण्यात आली. तसेच संरक्षणासाठी या जागेला कुंपणही घालण्यात आले आहे.

उंभार्ली येथे वन विभागाचे संरक्षित वन जमीन आहे. सर्व्हे नं. २८ अ वरील या संरक्षित वन क्षेत्रात ३० हेक्टर जमीन असून, त्यापैकी ३ हेक्टर म्हणजेच १० एकर परिसरात भूमाफियांनी सुमारे ३५० चाळी बांधून त्या विकल्या होत्या. अनेक वर्षांपासून तेथे शेकडो कुटुंबे राहत होती. डिसेंबर २०१८ मध्ये वन विभागाने मोठी कारवाई करीत त्या चाळी निष्कासित केल्या होत्या.

.... अशी झाली होती कारवाई

डिसेंबर २०१८ मध्ये सदर जागेवर उभारण्यात आलेल्या ३५० चाळींवर पोलीस, राज्य राखीव दलाच्या तुकडीच्या बंदोबस्तात वन खात्याकडून निष्कासनाची कारवाई करण्यात आली. रहिवाशांनी कारवाईला विरोध केला, दगडफेकीचा प्रयत्नही झाला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई केली गेली. जेसीबने सर्व चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या.