नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रत्नागिरी (प्रतिनिधी) :
नाणार येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे, अशी मागणी करीत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास समितीच्या वतीने धडक मोर्चा नेण्यात आला. शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील लोक या मोर्चात सहभागी झाले होते. 'चला असत्याकडून सत्याकडे', 'आता नाही तर कधीच नाही' अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला.

नाणार रिफायनरी समर्थनासाठी कोकण विकास समितीच्या पुढाकाराखाली मारुती मंदिर येथे मोर्चेकरी जमले. तेथून माळनाका सिव्हील हॉस्पिटल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा नेण्यात आला. नाणार येथील ग्रामस्थांसह परिसरातील तसेच राजापूर, लांजा, रत्नागिरी येथून हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. अनेक संस्थांनी मोर्चाच्या मागणीला समर्थन देत सहभाग घेतला. 'चला असत्याकडून सत्याकडे', 'आता नाही तर कधीच नाही' अशा घोषणा देत या मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचला. यावेळी नाणार प्रकल्प समर्थकांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन दिले. सदर प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे या प्रकल्पाला समर्थन असल्याने नाणार येथेच हा प्रकल्प व्हावा, अशी येथील जनतेची भावना असल्याचे शिष्टमंडळाने याप्रसंगी सांगितले.

दरम्यान, नाणार रिफायनरी प्रकल्पाला रिफायनरी विरोधी संघर्ष समितीसह काही संस्थांनी विरोध केल्याने शासनाने नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द केला होता. मात्र कोकण विकास समितीने या प्रकल्पाच्या समर्थनार्थ आज मोर्चा काढला.