कल्याण पूर्वेत सामाजिक संस्थांनी साकारले अज्ञात क्रांतिकारकांचे स्मृतीस्थळ

कल्याण पूर्वेत सामाजिक संस्थांनी साकारले अज्ञात क्रांतिकारकांचे स्मृतीस्थळ

कल्याण (प्रतिनिधी) : स्वातंत्रलढ्यात अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, मात्र आजच्या पिढीला असंख्य क्रांतीकारकांची नावेही माहीत नाहीत. अशा अज्ञात क्रांतिकारकांच्या स्मृती जपण्यासाठी कल्याण पूर्वेतील सामाजिक संस्थानी एकत्र येऊन अशा अशा अज्ञात क्रांतिकारकांच्या स्मृतीस्थळ व ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची निर्मिती केली आहे. महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या प्रांगणात साकारलेल्या या स्मृतीस्थळचे लोकार्पण कल्याण पूर्व विधानसभेचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. 

प्रजासत्ताक दिनी आ. गणपत गायकवाड यांच्या हस्ते सदर स्मृतीस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. आमदार गायकवाड यांनी या स्मृतीस्थळ व ज्येष्ठ नागरिक कट्ट्यासाठी आपल्या विकासनिधीतून सात लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आपल्या विकास निधीतून हे अभिमानास्पद काम पार पडल्याचे आमदारांनी आपल्या भाषणात याप्रसंगी आवर्जून नमूद केले.

कल्याण पूर्वेतील राष्ट्रीय विचार प्रबोधिनी, सहयोग सामाजिक संस्था व जाणीव सामाजिक संस्था यांनी विस्मृतीत गेलेल्या अनेक क्रांतिकारकांचे म्युरल, तसेच रेखाटलेली रंगीत चित्रे साकारून या स्मृतीस्थळ व ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची निर्मिती करण्यात आली आहे. दिवाकर गोळपकर व विजय भोसले यांच्या संकल्पनेतून सदर स्मृतीस्थळाची निर्मिती झाली आहे. 

यावेळी सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले, राष्ट्रीय विचार प्रबोधिनीचे अध्यक्ष दिवाकर गोळपकर व जाणीव सामाजिक संस्थेचे प्रथमेश सावंत, कल्याण पूर्वे भाजपचे मंडळ अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, शीतल मंढारी,सुनिता खंडागळे, परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष मस्के, प्रिया जाधव, रोटरीचे अध्यक्ष आशिष वाणी, विजय उपाध्याय, संदीप तांबे आदींसह कल्याण पूर्वेतील असंख्य मान्यवर उपस्थित होते.