राज्यात “झिरो पिरीयड” जाहीर करण्याची आपची मागणी

राज्यात “झिरो पिरीयड” जाहीर करण्याची आपची मागणी

कल्याण (प्रविण आंब्रे) : कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरीकापासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वापुढे कर्जफेडीचा प्रश्न उभा ठाकला असून सर्व आर्थिक व्यवहारांसाठी, प्रक्रीयाधीन नोकरभरती, कार्यालयीन कामकाज, विविध सुनावण्या इत्यादी सर्व बाबींसाठी कालमर्यादा वाढवून देण्यासाठी सध्याचा काळ हा “झिरो पिरीयड” (शून्य काळ) म्हणून घोषित करावा व त्यासाठी शासन आदेश जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा क्षेत्र अध्यक्ष  अॅड. धनंजय जोगदंड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इमेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे. सदर निवेदनात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र शासन केंद्र सरकारच्या एक पाऊल पुढेच असल्याची टिप्पणी करीत राज्य शासनाच्या प्रयत्नांचे कौतुक देखील करण्यात आले आहे.

देशभरात जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांसह खाजगी क्षेत्रातील कर्मचारी-कामगारांना घरी बसावे लागले आहे. नोकरीत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा तुलनेत खाजगी कंपन्या-कारखाने, आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना संचार बंदीचा सर्वात जास्त त्रास होत आहे. खाजगी छोट्या कंपन्या-आस्थापना, दुकाने-कार्यालये, रोजंदारी मजूर वा तत्सम हातावर पोट असणाऱ्या वर्गाला या महिन्याभराच्या काळातील वेतन मिळण्याची शक्यता फार कमी आहे. ज्या मजुरादी कामगारांचा ‘रोज’ बुडणार आहे त्यांच्यावर मात्र उपासमारीची वेळ ओढवणार आहे. या बाबीकडे सदर निवेदनात जोगदंड यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. शिधावाटप दुकानात पुरेसे धान्य मिळण्याची घोषणा राज्य शासनाने केली असली, तरी तेवढे पुरेसे ठरणार नाही. त्याव्यतिरिक्त सिलेंडर, केरोसीन तसेच अन्य जिनसा खरेदी करण्यासाठी या वर्गाच्या खिशात पैसेच नसणार आहेत. त्यावर उपाय म्हणून संचारबंदीच्या काळात प्रती महिना प्रती कुटुंब या प्रमाणे ५ हजार रुपये कुटुंबातील गृहिणीच्या अथवा सज्ञान व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यात यावेत. हे अनुदान पिवळी-केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, सगळ्याच आर्थिक उलाढालीवर परिणाम होत असल्याने दि. १५ मार्च पासून सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत होईपर्यंतचा कालावधी हा झिरो पिरीयड (शून्य काळ) जाहीर करीत या कालावधीत सर्वसामान्यांसह व्यापारी-उद्योजकांची कर्जाची परतफेड इत्यादी सर्व आर्थिक व्यवहारांसाठी, या पूर्वीपासून असलेल्या नोकरभरती प्रक्रिया, कार्यालयीन कामकाज पत्रव्यवहार प्रक्रिया इत्यादी सर्व बाबींसाठी असलेल्या कालमर्यादा वाढवून देण्यात याव्यात व मधला काळ हा “झिरो पिरीयड” (शून्य काळ) म्हणून घोषित करावा व त्यासाठी शासन आदेश जाहीर करण्यात यावा अशी मागणीही या निवेदनात केली आहे.

कल्याण शहरासह राज्यातील सर्वच शहरांमध्ये कोरोना तपासणीसाठी सुसज्ज यंत्रणा-लॅब सुरु करण्यात याव्यात. तसेच कल्याण शहरातील महापालिका रुग्णालयांतील आरोग्य यंत्रणा दयनीय अवस्थेत असून त्यात सुधारणा करून सुसज्ज व अद्ययावत रुग्णालय कल्याण-डोंबिवलीकरांना देण्याबाबत कार्यवाही करण्याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

संचारबंदी असतानाही ती धुडकावून अकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना, विशेषतः तरुणांना परिस्थिती समजून घेण्यास तयार नाहीत. अशा अकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना प्रत्येकी २ किंवा ३ हजार रुपये आर्थिक दंड ठोठावण्यात येऊन जागेवरच तो वसूल करण्याबाबत जोगदंड यांनी सूचित केले आहे. सदर ईमेल राज्यपाल, आरोग्यमंत्री, गृहमंत्री आदींनाही पाठविण्यात आला आहे.