कल्याण पूर्वेत शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची आप’ने केली मागणी  

कल्याण पूर्वेत शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची आप’ने केली मागणी  

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पूर्वेत चक्कीनाका चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

डोंबिवली महानगर अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड, निवडणूक प्रचार समितीचे सहसचिव भाऊ केदारे, कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष कोणार्क देसाई, ‘ड’ प्रभाग क्षेत्र प्रभारी राजेश शेलार, अब्बास घडीयाली आदींनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन सदरची मागणी केली आहे. सदरच्या निवेदनात, कल्याण पूर्व परिसराचा गतीने विकास होत आहे. येथील चक्कीनाका चौक हा गजबजलेला परिसर असून हा चौक कल्याण पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा महत्वाचा चौक आहे. या चौकात साऱ्या विश्वाला लोककल्याणकारी राज्याचा आदर्श घालून देणारे प्रेरणास्रोत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालया समोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची या भागातील नागरिकांची एकमुखी मागणी असून, त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचे काम देखील जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी देखील आपने केली आहे.