मुरूड येथे बेकायदेशीर पॅरासेलिंग करताना घडलेल्या अपघाताची चौकशी करून संबंधितांवर कारवाई 

मुरूड येथे बेकायदेशीर पॅरासेलिंग करताना घडलेल्या अपघाताची चौकशी करून संबंधितांवर कारवाई 

मुंबई (प्रतिनिधी) : 
मुरूड समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या अपघातात पॅरासेलिंग करताना अचानक पॅराशूटचा दोर तुटल्याने वेदांत पवार या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून बेकायदेशीर जीपद्वारे पॅरासेलिंग करणाऱ्या मालक व कामगार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित बेकायदेशीर जलक्रिडा रोखण्यासाठी आणि अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी शासन ठोस पावले उचलणार असल्याची माहिती पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानसभेत दिली.

रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर पॅरासेलिंग करताना घडलेल्या अपघातासंदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीस उत्तर देताना येरावार बोलत होते. येरावार पुढे म्हणाले की, महाराष्ट्र जलक्रिडा धोरण २०१५ मध्ये जीप पॅरासेलिंग हा प्रकार नाही. पर्यटन वाढले असल्याने पर्यटकांची संख्याही वाढली आहे. शासनाने विविध ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले आहेत. तसेच, साहसी क्रीडा प्रकार आयोजित करणाऱ्या संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. या समितीमार्फत चौकशी करून एका महिन्यात संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती येरावार यांनी दिली.