खाणपट्ट्यात अनधिकृतरित्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई - सुभाष देसाई

खाणपट्ट्यात अनधिकृतरित्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई - सुभाष देसाई

मुंबई (प्रतिनिधी) :
रत्नागिरी जिल्ह्यातील उबरशेत ग्रामपंचायत हद्दीतील खाणपट्ट्यात सुरू असलेल्या उत्खननाची पाहणी करून ते नियमबाह्य असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी विधानसभेत दिली. मौजे उटंबर, उबरशेत ग्रामपंचायत येथील खाणपट्ट्यात अनधिकृत उत्खनन होत असल्यासंदर्भात आ. अशोक पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना देसाई बोलत होते.

यावेळी ना. देसाई पुढे म्हणाले की, मौजे उटंबर, जिल्हा रत्नागिरी येथे पर्यावरणाची परवानगी नसल्याने कोणत्याही प्रकारचे उत्खनन सुरू नाही. तसेच, उबरशेत येथे अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीच्या अहवालानुसार तीन ते चार फुटाचे खोदकाम सुरू आहे. मात्र, तेथे जर अनधिकृतरित्या २०० ते ३०० फुटाचे खोदकाम होत असेल तर, संबंधित आशापुरा माईनकेम लि. कंपनीवर कारवाई करण्यात येईल असेही देसाई यांनी सांगितले. सदर खाणपट्ट्यात आंबा व काजू झाडांच्या बागा नसून तूरळक प्रमाणात झाडे आहेत. त्यावर धूळ उडू नये म्हणून कंपनीकडून खबरदारी घेण्यात येत असल्याची माहितीही देसाई यांनी दिली.