कडोंमपा शाळेतील शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी कृती आराखडा

कडोंमपा शाळेतील शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी कृती आराखडा

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महापालिका शाळेतील शैक्षणिक दर्जा व स्तर उंचावण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल व त्याचसोबत शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचा मनोदय महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या नवनिर्वाचित सभापती नमिता मयूर पाटील यांनी आज सांगितले. सभापती पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना त्या बोलत होत्या.

यावेळी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील हेही उपस्थित होते. नमिता पाटील पुढे म्हणाल्या की,  महापालिकेच्या यापूर्वी ६३ शाळा होत्या त्यापैकी ३ शाळांतील विद्यार्थ्यांना कमी पटसंख्येमुळे अन्य शाळांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. शाळांचा कमी होणारा पट प्रशासनाच्या माध्यमातून वाढविण्यावर भर प्रयत्न करणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील एकूण ५६० शाळांमधून १ लाख ६७ हजार ६८७ विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी समग्र शिक्षा अभियानातून व्यवस्था करण्याचा मानस असल्याचे त्या म्हणाल्या.

खाजगी शिक्षण संस्थांच्या स्तरावरील शिक्षण महापालिकेच्या शाळांतून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शैक्षणिक विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद करून त्याचा वापर विद्यार्थी विकासासाठी केला जाईल व सुरक्षा रक्षक व शिपाई भरती करण्यासाठी देखील प्रयत्न करू. महापालिका शाळेतील मराठी शिक्षणाचा दर्जा खालावत असून तो सुधारताना इंग्रजीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण देण्याची संकल्पना राबविली जाईल. कौशल्य विकासाच्या धर्तीवर शिक्षण देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून ई-लर्निंग सारख्या हायटेक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची मानसिकता विकसित करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शालांत परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविणाऱ्या महापालिका शाळेतील कोमल प्रल्हाद यादव विद्यार्थिनीला नमिता पाटील यांनी याप्रसंगी आर्थिक मदत केली.