गणेशोत्सव मंडपात शॉक लागून कार्यकर्त्याचा मृत्यू

गणेशोत्सव मंडपात शॉक लागून कार्यकर्त्याचा मृत्यू

कल्याण (प्रतिनिधी) : विसर्जनासाठी गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढत असताना विजेचा जोरदार झटका लागल्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा येथील एव्हरेस्ट नगर येथे घडली. प्रशांत चव्हाण (28) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

कल्याण पश्चिमेच्या बेतूरकर पाडा, एव्हरेस्ट नगर परिसरात गेल्या ३८  वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही या मंडळाकडून भक्तीभावपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी संध्याकाळी या मंडळात विसर्जनाची तयारी सुरू होती. त्याचवेळी जोरदार आलेल्या पावसामुळे मंडपातील लाईट चालू बंद होऊ लागले. ते पाहण्यासाठी मंडळाचा कार्यकर्ता प्रशांत चव्हाण पुन्हा मंडपात गेला आणि तिकडे तपासणी सुरू असताना त्याला विजेचा जोरदार शॉक लागला. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून इतर कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता प्रशांत खाली पडल्याचे त्यांना दिसून आले. क्षणाचाही विलंब न दवडता कार्यकर्त्यांनी त्याला  रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान प्रशांत मृत्यू झाला. या घटनेमुळे एव्हरेस्ट नगर परिसरात शोककळा पसरली आहे.