मानवतेची भावना जपणारा कार्यकर्ता: धिरेश हरड

मानवतेची भावना जपणारा कार्यकर्ता: धिरेश हरड

कोलाहालात सार्‍या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी

मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी ऐकल्यावर व्यक्ती सहज विचार चक्रात गुरफटून जाते. समाजातील व्यक्तीवेध घेणार्‍या ह्या ओळी. माणूस शब्द वापरतांना ह्या ठिकाणी गर्दीतला 'माणूस' म्हणजे मानवी शरीराने तर शोधायचा माणूस विशिष्ट गुणसमुच्चय असलेला. माणूस फक्त शरीराने असून चालत नाही तर त्याच्याकडे मानवता हा गुण असावा लागतो. माणसाला मदत करण्याची भावना- ही भावना प्रत्येकात असते, मात्र सातत्याने दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती फारच कमी जणांमध्ये असते. ही मानवतेची भावना जपणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणजेच धिरेश पांडुरंग हरड होय.

वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून धिरेशदादा समाजसेवा करतायत. चांगली गलेलठ्ठ पगाराची कार्पोरेट क्षेत्रातील नोकरी. मुळात म्हणजे कार्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती आणि समाजसेवा या तशा भिन्न वाटणाऱ्या गोष्टी, मात्र धिरेश यांनी कार्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर असतानाही आपली मातीशी नाळ कायम राखता येते हे आपल्या समाजसेवेने दाखवून दिले आहे. आज जो-तो स्वत:साठी, आपल्याच कुटुंबासाठी जगताना दिसत आहे. दुसऱ्याकडे पाहायला देखील कुणाला वेळ नाही. अशा काळात गरीब-गरजूंना मदतीचा हात देणारी, त्यांच्या आनंदात स्वत:चे समाधान शोधणारी व्यक्तिमत्वे अभावानेच सापडतात. समाजातील चंगळवादाच्या कोलाहलात एखादा धिरेशदादा सारखा माणूस समाजासाठी जगताना दिसतो आणि माणसात माणूसपण अजून शिल्लक असल्याची जाणीव होते. आज समाजसेवक कमी नाहीत, मात्र त्यांची समाजसेवा कोणत्या तरी अंतन्स्थ हेतूने असल्याचे स्पष्टपणे दिसते, मात्र धिरेशदादा सारखा समाजसेवक विरळच. बाप बनून हजारो अनाथ मुलींची लग्न लावून त्यांचे कन्यादान करणारा  कॉर्पोरेट क्षेत्रातील समाजसेवक पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का नाही बसला तर नवलच.

लहानपणी हत्तीला जेवतांना पाहिले होते. तो त्याच्या जेवण करण्याच्या गुणावरून मला खूप आवडला. हत्ती जेवताना प्रथम दोन तीन घास सोंडेनं हवेत उडवून देतो. मग एक घास खातो. पुन्हा दोन तीन घास हवेत उडवतो आणि नंतर एक घास स्वत: खातो. त्याची ही कृती पाहिली तर एखाद्या माणसाला आश्चर्य वाटेल. हत्ती का बरे असा जेवत असेल ? पण हत्तीची जेवतानाची कृती सांगत असते. 'माझ्यासारखा बलशाली मोठा जिव अन्नग्रहण करतो. त्यावेळेस वातावरणातील इतर जिवांनासुद्धा अन्न मिळावे. म्हणून जेवतांना काही घास तो हवेत उडवत असेल. हे हत्तीचे उदाहरण धिरेशदादांच्या बाबतीत जुळतांना दिसले. मंगेश पाडगावरांच्या पुढील ओळी त्यांची माफी मागून मला म्हणावेसे वाटते....

कोलाहलात सार्‍या माणूस  मला सापडला
गर्दीत माणसांच्या माणूस मला सापडला !

गावातील गरीब लोकांना सबल बनवायला हवे. आणि ते फक्त शिक्षणानं शक्य आहे. हे त्यांना आजोबा स्वर्गीय शंकरराव शिंदे पाटील यानी सांगीतलं. आजोबांच्या ह्या उपदेशाचा त्यांच्या बालमनावर खूप सकारात्मक बदल झाला. तारुण्यातील कमावलेला पैसा त्यांनी समाजसेवेला वापरण्यास सुरवात केली. आज मिळणार्‍या पैश्यात समाधान शोधून सापडत नाही. प्रत्येकाला कमतरता पडणारी बाब म्हणजे पैसाच आहे. पैसा कमविण्यासाठी व्यक्ती स्वत:चे घर सोडून येते. शिक्षण जोडीला असते. शिक्षणानं नोकरी मिळवलेली असते. नोकरीत गरजा भागविण्या एवढा पैसाही असतो. पण मध्यमवर्ग सोडून प्रत्येक व्यक्ती उच्चमध्यमवर्गाचा हव्यास धरते, त्यासाठी त्यांना हवा असतो पैसा. मग उत्पन्नवाढ होण्यासाठी सुखी समाधानी जीवन तारण ठेवावे लागते. सहज विचार करण्यासारखे उदाहरण पहाना. भाड्याचे घर सोडून स्वत:च्या घराचा विचार सुरू होतो. प्रयत्नांना यश येऊन स्वप्न साकारते. मग मोठं घर असावे हा विचार पुढे येतो. चारचाकी वाहन दिसते शेजार्‍याच्या दारात. ह्या सगळ्यात वास्तव आनंदित जीवन जगायचे राहून जाते. ज्या विचाराने पैसा कमवायला प्रेरित झालो असतो. जेव्हा ऐषोराम करायची वेळ येते त्या वेळेस वय वाढलेलं असते. वाढते वय आजार घेऊन येते. काय मौज घेणार पैश्याची. पण धिरेशदादांनी या सर्व चंगळवादाच्या विचारांना फाटा देत. एका नवीन पाऊलवाटेची सुरवात केली.

दरवर्षी अनाथ आश्रमात जाऊन स्वत:चा जन्मदिन तर ते दरवर्षी साजरा करतात. त्या आश्रमातील मुलं म्हणजे यांची घरातील, स्वत:ची समजून त्यांच्या संगतीत मिष्टान्नाच्या मेजवानी ते रंगतात. मुलांच्या विविध कलागुणांना विशेष वाव मिळावा म्हणून ते त्यांच्यासाठी गायनाचे शिबिरांचे आयोजन करतात. आज अनेक अनाथ आश्रमातील मुलींसाठी त्यांनी मोफट कराटे क्लासेसे सुरू केले. आज मुली प्रगती करत आहेत. नोकरी करीत आहेत. कामावरून घरी जायला त्यांना उशीर होतो. त्यांना स्वत:चे रक्षणार्थ ज्या गोष्टीची गरज आहे ती धिरेशदादांनी ओळखली. काही गरीब कुटूंबातील महिलांना प्रशिक्षण देऊन शिलाई मशीनचे वाटप किंवा ब्युटिपार्लरचे प्रशिक्षण शिबीर घेऊन महिला सबलीकरणाची सामाजिक जबाबदारी त्यांनी पेलली. UPSC किंवा MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन त्यांनी केले. जेथे जेथे समाजामध्ये उणे दिसते. तेथे तेथे पोहचण्याचे काम धिरेशदादा यांनी केले. 

एक दिवस दादांना समजले की, कुणी साठ वर्ष वयाचे जेष्ठ नागरिक दिव्याच्या अंधुक उजेडात १५-२० वर्तमानपत्रे रोज वाचून काढतात. धिरेशदादांनी त्यांना विना विजेचा नाईट लॅम्प खरेदी करून दिला. यासाठी त्यांनी पांडुरंग प्रतिष्ठान ही नोंदणीकृत संस्था स्थापन केली. या संस्थेला आयएसओ मानांकनही मिळाले. ह्या कामात त्यांच्या पत्नीचे सहकार्य त्यांना लाभतेच. पत्नी दिक्षीता या धिरेशदादा सोबत 'धर्मेच कामेच अर्थेच नाती चरामी' लग्नात सप्तपदी चालताना घेतलेल्या शपथेप्रमाणे कायम असतात. आई विमलबाई आणि वडिल पांडुरंग गुरूजी, बहीण संगीताताई यांना धिरेशचा अभिमान वाटतो.  धिरेश दादा सांगतात, "मला दोन मुली आहेत दिव्या आणी आंकीता. मला माझ्या मुलींच्या भवितव्याची जी चिंता आहे. त्या अनुषंगाने मी जे काही निर्णय घेतो. जे काही वडिलकीच्या नात्याने माझ्या मुलींसाठी करतो. तोच माझा प्रयत्न असतो समाजातील अनाथ गरीब मुला-मुलींसाठी. मी मुलींसाठी जास्त करतो. कारण मी मुलींचा बाप आहे. म्हणून मला अनाथ मुलींचा बाप बनायला आवडते."

कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्य्यात त्यांनी तर गरजू कुटुंबांना  नाना प्रकारची मदत केली. मुरबाड, कल्याण येथील सुमारे ७००० कुटुंबांना त्यांनी महिनाभराचे अन्नधान्याचे कीट पोहोचवले. मास्क, सनिटायझरची तर गणतीच नाही. एवढेच नाही तर रुग्णांनी रुग्णालये फुल्ल झालेली असताना अनेकांना रुग्णालयात बेड मिळत नसताना धिरेश हरड यांनी एम्स वा त्यासारख्या इतर रुग्णालयात बेड मिळवून दिले. ऑक्सिजनची कमतरता असताना गरजू रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून दिले. कोविड काळात अनेकांसमोर उपचारासाठी आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या हे पाहता धिरेश यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी आदी तालुक्यातील हजारो गरजू कुटुंबांना स्वखर्चाने आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून दिले, अजूनही देत आहेत. आजीच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी नुकतेच कल्याणमधील महंमदअली चौक येथील शिवमंदिर ट्रस्टमध्ये गरिबांना अन्नदान केले. नियमित असे अन्नदान ते करीत आहेत.

मुळचे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील असलेले धिरेशदादा नोकरीनिमित्त कल्याण येथे स्थायिक झाले आहेत.  निसर्गदत्त बुद्धिमत्ता लाभलेल्या दादांनी तेराव्या वर्षीच दहावीची बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली. दादांच्या सामाजिक कार्याची दखल असंख्य सामाजिक संस्थांनी घेत त्यांचा गौरव केला आहे. कित्येक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत तर विश्व मानव अधिकार सुरक्षा आयोग, दिल्ली यांनी सामाजिक सेवेसाठी डॉक्टरेट प्रदान केली आहे. युवा खेलकुद महासंघाच्या सहकार्याने व केंद्र सरकारच्या लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, नीती आयोग यांच्या मान्यतेने दिला जाणारा ध्रुव रतन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदा धिरेशदादांना देऊन सन्मानित करण्यात आले यातच दादांच्या सामाजिक कार्याची उंची दिसून येते.

गेल्या वर्षी त्यांनी कोविडमुळे वाढदिवस साजरा केला नाही. यंदाही ते आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. गत वर्षभरात त्यांच्या मामी रंजना संभाजी शिंदे, भावोजी ...कमलाकर बांगर.. , जवळचे मित्र, शिवचरित्रकार संत साहित्याचे अभ्यासक व विचारवंत डॉ. दिलीप धानके (शहापूर) या जवळच्या नातेवाईकांचे दु:खद निधन झाले. आपल्या हातून घडणारी सेवा त्यांनी या आपल्या दिवंगत सहृदयांना अर्पण केली आहे. आपल्या जन्मदिनानिमित्त ते शहापूरच्या किन्हवली येथील गरीब गरजू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे क्लास घेणाऱ्या संतोष दवणे सर यांच्या क्लासमधील ११ वीच्या विद्यार्थ्यांना सायन्सचे सेट भेट देणार आहेत.
 
आज १५ ऑगस्ट रोजी धिरेश हरड यांचा वाढदिवस आहे. जन्मदिनानिमित्त  ईश्वर त्यांना शारिरीक मानसिक आरोग्य स्थिर देवो. अशी मी भगवंताकडे मागणी करतो. कारण चंगळवादाच्या कोलाहालात धिरेश पांडुरंग हरड यांच्यासारखी मानवता जपणारी माणसं आहेत म्हणूनच समाज समतोल आहे. त्यांच्या मोठे बंधू मोतीराम (अप्पा) हरड यांच्या आकस्मिक जाण्यामुळे गेल्या ८ वर्षापासून ते आपला वाढदिवस साधेपणात आश्रमशाळांतील गरीब मुलांना शालेय साहित्याचे वाटप व अन्नदान करून करतात. कोणतीही भेटवस्तू वा पुष्पगुच्छ ते स्वीकारत नाहीत. अशा या व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! शेवटी एक म्हणावेसे वाटते...

रंजल्या जिवाची मनी धरी खंत
तोची खरा साधू, तोची खरा संत

---

लेखक: प्रभाकर सुधाकर पवार, (कल्याण)