आदित्य ठाकरे यांची डोंबिवलीकरांना भावनिक साद 

आदित्य ठाकरे यांची डोंबिवलीकरांना भावनिक साद 

डोंबिवली (प्रतिनिधी) :
जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात फिरत असतांना प्रत्येक जण त्याच्या मनातील गोष्टी मला सांगत आहे. जो शेवटचा आवाज आहे- जो माझ्यापर्यंत पोहचत नाही त्यांच्या अडचणी सोडवायच्या आहेत. मला आमदार-खासदार, मंत्री बनायचे नाही, तर मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद द्या, अशी भावनिक हाक शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी डोंबिवली येथे दिली.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून साडेपाच हजार किलोमीटरचा प्रवास करून डोंबिवलीत दाखल झाले त्यावेळी त्यांनी उपस्थित डोंबिवलीकरांची संवाद संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, माझ्या आईचे गांव डोंबिवली. माझी मावशी-आजीही डोंबिवलीची, पण मला प्रचारासाठी सभेत बोलावे लागेल, असे कधीच वाटले नव्हंते. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी जो विश्वास टाकला त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढून त्यांची मने जिंकायची आहेत.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळीकडे फिरत असतांना वंचितांच्या समस्या समजून घेत आहे. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. सर्वांनी मला हात वर करून आशीर्वाद द्या. मी एकटा नवा महाराष्ट्र घडवू शकत नाही. सर्वांची ताकत हवी आहे. नवा महाराष्ट्र घडविणे हा एकट्यादुकट्याचे काम नाही आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.

यावेळी डोंबिवली शहर शाखेच्या माध्यमातून शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश गोवर्धन मोरे यांनी आदित्य ठाकरे यांना चांदीची तलवार भेट दिली. महापौर विनिता राणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, आमदार सुभाष भोईर, किशोर मानकामे, राहुल म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.  

कल्याण डोंबिवलीतील खड्डे...

कल्याण डोंबिवली शहरातील खड्ड्यांच्या समस्येविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, रस्त्याची कामे करीत आहोत, पण धुवाधार पावसामुळे खड्डे पडत आहेत. ग्रामीण भागात पंतप्रधान मुख्यमंत्री ग्राम सडक योजने माध्यमातून काम करू. तर येथील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री शहर सडक योजना करून कल्याण-डोंबिवलीसाठी निधी आणू. शेवटी ज्यांच्यावर विश्वास आहेत त्यालाच समस्या अडचणी सांगितल्या जातात, असेही ते म्हणाले.