दिल्ली विजयानंतर 'आप'ने कल्याणकरांना घडवला मोफत बस प्रवास

दिल्ली विजयानंतर 'आप'ने कल्याणकरांना घडवला मोफत बस प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) :
काम करणाऱ्यालाच जनता मत देते यावर दिल्लीत आम आदमी पार्टीला मिळालेल्या निर्विवाद विजयाने सिद्ध झाल्याचे मत आम आदमी पार्टी कल्याण लोकसभा क्षेत्र अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी कल्याण येथे दिल्ली विजयाचा आनंदोत्सव साजरा करताना मंगळवारी व्यक्त केले.

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये निर्विवाद बहुमत मिळवित आपला विजय साकारला. दिल्लीकरांना वीज, पाणी, मल:निसारण, शिक्षण, आरोग्य यासह रोजगार, खेळ, महिला सुरक्षा, दळणवळण इत्यादी दर्जेदार सोयीसुविधा देत आपने केलेल्या लोकोपयोगी कामामुळेच जनतेने आपला कौल दिला. या धर्तीवर आगामी महापालिका निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीकरांना कल्याणमध्ये शांघाय नव्हे, सिंगापूर नव्हे तर दिल्ली मॉडेल राबविण्याची  संधी मिळणार असल्याचे जोगदंड यावेळी म्हणाले.

यावेळी कल्याणमधील रिंगरूट, पूर्वेतील गणेश चौक ते चिंचपाडा अशा काही केडिएमटी बसच्या प्रवाशांना त्यांचे तिकीट आपण काढत आप कार्यकर्त्यांनी त्यांना मोफत बस प्रवास घडवत त्यांना' दिल्ली मॉडेल'चे दर्शन घडवले. शिवाजी चौक, कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका, चिंच पाडा शंभर फुटी रस्ता, काटेमानीवली नाका, मराठा कोळसेवाडी येथील गणेश चौकात येथे नागरिकांना लाडू आणि पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी आपचे पदाधिकारी रविंद्र केदारे, राजू पांडे, उमेश कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, निलेश व्यवहारे, राजेश शेलार, तेजस नाईक, रविंद्र तंवर, कौशिक काळे, आमीर बेग आदी उपस्थित होते.