केडीमसीसह महापालिका निवडणुकीत आघाडी- काय म्हणाले जयंत पाटील?

केडीमसीसह महापालिका निवडणुकीत आघाडी- काय म्हणाले जयंत पाटील?

कल्याण (प्रतिनिधी) : येत्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडी होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना पाटील यांनी आम्ही एकत्र सरकारमध्ये काम करतोय, एकत्र सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे असे आमचे धोरण नाही. महाविकास आघाडीमधील पक्ष जिथे जिथे एकत्रीत राहतील त्याला प्राधान्य देऊ, असे उत्तर जयंत पाटील यांनी दिले. 

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील सोमवारी कल्याणात जिल्हा कार्यालयाच्या उदघाटन व कार्यकर्ता मार्गदर्शनासाठी आले होते त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी कल्याण जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश प्रवक्ता महेश तपासे, जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील पुढे म्हणाले की, एकेकाळी कल्याण डोंबिवली महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर होत. मधल्या काळात अनेक घटना घडल्या. आता अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा उभारी येईल. कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांबाबतही पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले, शहरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या दुरावस्तेमुळे अनेक अपघातही घडले. याला तत्कालीन सरकार जबाबदार आहे. या रस्त्यांना प्राधान्य देऊ आणि ते प्रश्न सोडवू, असे ते म्हणाले.

पप्पू कलानीबाबत पत्रकारानी जयंत पाटील यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी सांगितले की, त्यांच्या समाजाचा सण होता. त्यानिमित्ताने त्यांना भेटलो आणि जेवण केले. राजकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या गर्दीमुळे कल्याणकर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.