कोंबड्या उडवत शिवसैनिकांचे आंदोलन; भाजपचा मोर्चा  

कोंबड्या उडवत शिवसैनिकांचे आंदोलन; भाजपचा मोर्चा  

कल्याण (प्रतिनिधी) : केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातील व्यक्तव्यावरून संतप्त झालेले शिवसैनिक राज्यभर रस्त्यावर उतरले आहेत. कल्याण डोंबिवली शहरात शिवसैनिकांनी कोंबड्या उडवीत निदर्शने केली. कल्याण येथील भाजपचे कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक केली तर भाजपने शिवसेनेविरोधात कल्याणमध्ये मोर्चा काढला.

डोंबिवलीत इंदिरा चौकात शिवसैनिकांनी कोंबड्या उडवीत घोषणाबाजी करत आंदोलन केले. डोंबिवली येथे शहरप्रमुख राजेश मोरे, उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली पूर्व युवा सेना अधिकारी सागर जेधे, अभिजित थरवळ, राजेश कदम, संतोष चव्हाण, कविता गावंड, वैशाली दरेकर, मंगला सुळे, राहुल म्हात्रे यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी शिवसैनिक आणि रामनगर पोलिसांमध्ये कोंबड्या उडवण्यावरून झटापट झाली, तरी शिवसैनिकांनी कोंबड्या उडवत राणेंच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिकानी राणेंच्या प्रतिमेला चप्पल मारत आंदोलन केले. पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले. 

कोळसेवाडीतील मध्यवर्ती शिवसेना शाखेसमोर सहसंपर्कप्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वा खाली नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून राणे यांचा जाहिर निषेध करण्यात आला. यायावेळी उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, निलेश शिंदे, शांताराम दिघे, संगीता गायकवाड, राजवंती मढवी, विवेक बर्वे, आत्माराम दिघे, कल्याण धुमाळ, गंबाजी लाड, मीना माळवे, सुशीला माळी, राधिका गुप्ते, प्रकाश देसाई, कृष्णा साळुंखे, किरण नीचळ, अजित चौगुले, आणि महिला आघाडी, युवा सेने, आणि कार्यकर्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कल्याण पूर्वेतील गुंजाई चौकात राणे यांच्या प्रतिमेला चपलेचा हार घालण्यात आला, तसेच राणेंच्या पुतळ्यांला पायाने तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

अहिल्याबाई चौकातील भाजपच्या कार्यालयावर सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, महानगर प्रमुख विजय साळवी, जयवंत भोईर यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी चाल करीत दगडफेक केली. यावेळी तेथील भाजपचे कार्यकर्ते प्रताप टूमकर यांना मारहाण करण्यात तरी टूमकर यांनी पळून न जाता शिवसैनिकांना एकाकी विरोध केला व कार्यालय सोडले नाही.

दरम्यान, प्रताप टूमकर यांच्या बहादुरीची दखल घेत भाजपच्या वतीने त्यांच्या मोठा सत्कार करण्यात आला.

कल्याण पश्चिमेत दीपक हॉटेल येथेही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक अरविंद मोरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसैनिकांनी येथेही कोंबड्या उडवत राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला.

दरम्यान, अहिल्याबाई चौकातील भाजप कार्यालयावर शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेक प्रकरणी भाजपने शिवसेना पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजपचे शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकापर्यंत मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी त्यांना सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे जाण्यापासून रोखून धरले.