कोकणातील पहिल्याच पंचतारांकित पर्यटन केंद्रासाठी जमीन हस्तांतरण

कोकणातील  पहिल्याच पंचतारांकित पर्यटन केंद्रासाठी जमीन हस्तांतरण

मुंबई (प्रतिनिधी) : मौजे शिरोडा वेळागर (जि. सिंधुदूर्ग) येथील जमीन हस्तांतरण करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील शासन निर्णयानुसार मौ. शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याकरिता इंडियन हॉटेल्स प्रा. लि. (ताज ग्रुप) यांना संपादीत केलेली व शासकीय जमीन मिळून एकूण ५४.४० हेक्टर जमीन ९० वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्याकरिता भाडेकरार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने गुरुवारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मे. इंडियन हॉटेल प्रा. लि. (ताज ग्रुप) यांच्यामध्ये लीज डीड व सब लीज डीड हे दोन करार करण्यात आले.

गोवा राज्यात अनेक पंचतारांकित प्रकल्प, हॉटेल्स, रिसॉर्ट अस्तित्वात आहे. इंडियन हॉटेल प्रा.लि.(ताज ग्रुप) ही एक नामांकित संस्था असून त्यांच्यामार्फत कोकणामध्ये प्रथमच पंचतारांकित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मे. इंडियन हॉटेल प्रा.लि. (ताज ग्रुप) हे पहिल्या टप्पात १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या प्रकल्पामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात देशी व परदेशी पर्यटक आकर्षित होतील. तसेच यामुळे रोजगार निर्मिती व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. याबरोबरच ताडोबा परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग आणि थ्रायव्हींग हॉटेल्स यांच्यामध्येही यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. 

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार विनायक राऊत, दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, मे. इंडियन हॉटेलचे (ताज ग्रुप) कार्यकारी उपाध्यक्ष आणि जनरल कौन्सेल राजेंद्र मिस्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष बिजल देसाई, थ्रायव्हींग हॉटेल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण जैन आदी मान्यवर उपस्थित होते.