कल्याणमधील पूरग्रस्तांना आजपासून आर्थिक मदत – आ. पवार

कल्याणमधील पूरग्रस्तांना आजपासून आर्थिक मदत – आ. पवार

कल्याण (प्रतिनिधी) :
पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या कल्याण परिसरातील कुटुंबियांचे पंचनामे पूर्ण झाले आहे. या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यास सोमवारपासून (आज) सुरुवात होणार असल्याची माहिती कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. 

कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात दीड महिन्यापूर्वी दोन वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी आंबिवली, टिटवाळा, कल्याण पूर्व-पश्चिम तसेच ग्रामीण भागात विशेषत: उल्हास, काळू आणि वालधुनी नदी किनारच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून शेकडो कुटुंबांच्या घरांमधील साहित्य महत्वाची कागदपत्रांचे नुकसान झाले. परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान झाले. काहींना या काळात कामावर जाता आले नाही अशाप्रकारे त्यांचे दोन्ही बाजूंनी प्रचंड नुकसान झाले. आ. नरेंद्र पवार यांनी मतदारसंघातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली होती.

सदर पूरग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी त्यांचे पंचनामे देखील करण्यात आले. पंचनामे होऊनही पूरग्रस्तांना मदत करण्यात शासनाकडून उशीर होत होता. ही मदत तातडीने मिळण्याची आवश्यकता लक्षात घेऊन कल्याण पश्चिमचे आमदार पवार यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना भेटून नुकसान झालेल्या कुटुंबीयांना तातडीने सर्वोतोपरी मदत मिळण्याबाबत पत्र दिले. अखेरीस शासनाकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीसाठी निधी मंजूर करण्यात आला. सोमवार दि. १६ सप्टेंबर २०१९ पासून कल्याण परिसरातील पूरग्रस्त कुटुंबीयांना मदत पोहचवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती आ. पवार यांनी दिली आहे. शेवटच्या पूरग्रस्त कुटुंबापर्यत ही मदत पोहोचेल याकडे आपण लक्ष देऊ असा विश्वास त्यांनी दिला आहे.