महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका !

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका !

ठाणे (प्रतिनिधी) : 
बदलापूर येथील वांगणी जवळील सामटोली परिसरात महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये प्रवासी अडकल्याच्या घटनेनंतर पहाटेपासून सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी तत्परतेने मदतकार्य करीत गाडीत अडकलेल्या प्रवाशांना प्रथम सह्याद्री मंगल कार्यालयात सुरक्षित हलविले. तेथे प्रवाशांच्या जेवणाची तसेच ३७ डॉक्टर्सच्या टीमद्वारे वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली. तेथून त्यांना १४ एसटी बसेस आणि तीन टेम्पोच्या माध्यमातून बदलापूर स्थानकावर पोहोचवण्यात आले. तेथून पुढे त्यांच्या इच्छित स्थळी प्रवासाची व्यवस्था रेल्वेमार्फत करण्यात आली.

रविवारी पहाटे सहाच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या तत्काळ मदत कार्यावर देखरेख ठेवण्याच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आणि संबंधित प्रांत अधिकारी, तहसीलदार, एनडीआरएफ, आरपीएफ, स्थानिक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, नेव्ही, अग्निशमन दल आदी यंत्रणांच्या सहकार्याने या प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जिल्हाधिकारी नार्वेकर स्वतः या मोहिमेवर देखरेख करीत होते.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून सुमारे एक हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. यामध्ये नऊ गरोदर महिलांचा समावेश होता. प्रवाशांच्या मदतीसाठी ३७ डॉक्टरांसह रूग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या होत्या. त्यात स्त्रीरोग तज्ञांचाही समावेश होता. सह्याद्री मंगल कार्यालय येथे सर्वांची राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली. एका गरोदर महिलेला निकड लक्षात घेऊन जवळच सुश्रुत रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी १४ बसेस आणि ३ टेम्पोची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक सामाजिक संस्था आणि रहिवाशांनी देखील या मदतकार्यात सक्रीय सहभाग घेतला.

रविवारी पहाटे या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी मुंबईतील तीन आणि पुण्यातील दोन अशा पाच एनडीआरएफ टीमना मदतीसाठी पाचारण केले. तर ठाणे महापालिकेची एक टीम या मदतकार्यात सहभागी झाली. प्रवाशांना हवाईमार्गे बाहेर काढण्याची आवश्यकता लक्षात घेऊन हेलिकॉप्टरला देखील बोलावण्यात आले. संपूर्ण यंत्रणांनी मिळून तत्परतेने मदतकार्य केल्याने सर्व प्रवाशांना दुपारी दोनच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला मदत कार्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांनी मदत कार्याची स्वतः पाहणी केली. महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये प्रवासी अडकल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ  मदत कार्यावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते.