आदिवासी विद्यार्थ्यांना समन्वय प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्याचे वाटप

आदिवासी विद्यार्थ्यांना समन्वय प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्याचे वाटप

मुरबाड (प्रतिनिधी) : 
आदिवासी समाजातील बांधवांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून त्यांचे जीवनमान हलाखीचे आहे. परिणामी या समाजातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणापासून वंचित राहतात. राज्य शासन विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करीत असतानाही विद्यार्थ्यांपर्यंत पुरेशी मदत पोहचत नाही. ही बाब लक्षात घेत कल्याण येथील समन्वय प्रतिष्ठानच्या  वतीने मुरबाड तालुक्यातील बारवी धरण परिसरात असलेल्या कोळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ४४ गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.

समन्वय प्रतिष्ठान मार्फत गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येक दिवाळीत व शाळा सुरू होताना  विविध आदिवासी पाड्यात आदिवासी विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ तसेच शालेय साहित्याचे मोफत वाटप केले जाते. प्रतिष्ठानचे सदस्य आपसात निधी जमवून त्यातून ही मदत केली जाते. यंदाही कोळे वाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ४४ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी समन्वय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ वकील जनार्दन टावरे, ठाणे न्यायालयाचे  सरकारी वकील विजय मुंडे, वकील सुभाष संभारे, वकील प्रवीण मालुसरे, वरिष्ठ पत्रकार अविनाश उबाळे, शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत डोहाळे, शाळेचे सहशिक्षक मनोहर भोईर, शहापूरचे बहुजन समाज पार्टीचे जेष्ठ नेते के. के. संगारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगल निरगुदा, माजी सरपंच नागेश बांगरा, कातकरी समाजाचे नेते लक्ष्मण भोसले, चार्टअड अकाऊंटंट आशिष चौधरी, उद्योजक गुरुनाथ भोईर आदींसह समन्वय प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील सुनील उबाळे यांनी केले.