विजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

टिटवाळा (प्रतिनिधी) : वीज वाहिनीवर दुरुस्तीचे काम सुरु असताना विजेचा शॉक लागून एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येथून नजीकच असलेल्या बल्याणी परीसरात घडली आहे. मुशीर खान शाहिद खान (वय २६) असे या घटनेतील मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

मुशीर खान शाहिद खान हा महावितरणच्या टिटवाळा विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता. काल (शनिवारी) रात्री आठ वाजल्यापासून बल्याणी, उंभरणी, मानिवली, मानिवली पाडा इत्यादी परिसरातील विद्युत सेवा खंडित झाली होती. ही विद्युत सेवा पूर्ववत करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. त्यावेळी अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्यात जोराचा शॉक लागून मुशीरचा जागीच मृत्यू झाला. 

याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे. मुशीर शव शवविच्छेदन करण्यासाठी कल्याणच्या रुख्मिणीबाई इस्पितळात नेण्यात आले. मुशीर खान याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे महावितरणसह संपूर्ण बल्याणी परिसरात दु:खाचे सावट पसरले आहे.