... आणि महायुतीच्या बंडखोर उमेदवारांचे धाबे दणाणले!

... आणि महायुतीच्या बंडखोर उमेदवारांचे धाबे दणाणले!

कल्याण (प्रविण आंब्रे) : 
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कल्याण तालुक्यातील कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण या तिनही मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडाचा झेंडा फडकावीत दोन विद्यमान आमदारांसह एका इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल करीत पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले आहे. दरम्यान, मुंबई घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना उमेदवारी मागे घ्यायला लावू, असे सांगतानाच जे बंडखोर माघार घेणार नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊन, असे स्पष्ट केल्याने कल्याणमधील बंडखोर उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
 

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विद्यमान भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांचा पत्ता कट झाल्याने त्यांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात बंडखोरी करीत हजारो कार्यकत्यांची रॅली काढत उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई विद्यापीठ उपकेंद्रातील कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार पवार यांनी यावेळी भाजपच्या वतीने एक तर अपक्ष म्हणूनही दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे रॅलीतील कार्यकत्यांच्या हातात भाजपचे व रिपाईचे झेंडे पाहावयास मिळाले. सेनेचे शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनीही युतीच्या हजारो कार्यकर्त्यांची कार्यकत्यांची रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत या मतदारसंघात तिरंगी लढत रंगण्याचे संकेत दिले आहेत. 

कल्याण पूर्व विधानसभा भाजपच्या वाट्याला गेल्याने उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारे यांनीही भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी करीत  हजारो कार्यकत्याचे शक्तीप्रदर्शन करीत कल्याण पूर्वेतील पालिकेच्या 'ड' प्रभाग कार्यालयातील निवडणूक कार्यलयात उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे गुरुवारी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनीही  जोरदार शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे त्यांचे समवेत उपस्थित होते. मात्र कल्याण पूर्व मतदारसंघातील शिवसेना नगरसेवकांनी मात्र बंडखोर धनंजय बोडारे यांच्या रॅलीत मोठ्या संख्येने कल्याण आणि उल्हासनगर पालिकेचे सेना नगरसेवक सहभागी झाल्याचे दिसून आले. आमदार गायकवाड हे शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून दोन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. यंदा मात्र यापूर्वीच भाजपच्या छावणीत डेरेदाखल होत होत भाजपकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यामुळे  स्थानिक  शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आमदाराला पराभूत करण्यासाठी चंग बांधल्याचे दिसून आले. 

दरम्यान, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना दिलेली उमेदवारी अचानक बदलत शिवसेनेच्या वतीने नगरसवेक रमेश म्हात्रे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. पण तत्पूर्वीच सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिला होता. त्यांचा पत्ता कट झाल्याने ते नाराज झाले आहेत. नेतृत्वाने आदेश देऊनही उमेदवारी कायम ठेवल्यास सेनेची अडचण होण्याची चिन्हे आहेत. त्याउपरही भोईर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यास त्यांच्यावर बंडखोरीचा शिक्का लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कल्यायाणमधील या तीनही विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी मोडून काढण्यासाठी युतीकडून वरिष्ठ पातळीवरून हरतर्हेने प्रयत्न केले जाण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बंडखोरांना इशारा दिल्यानंतर कल्याणमधील किती बंडखोर मैदान सोडतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ७ तारखेला निवडणुकीचे अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होईल.