केडीएमटीच्या कमी क्षमतेच्या बस सोडण्यावरून टिटवाळाकरांमध्ये संताप

केडीएमटीच्या कमी क्षमतेच्या बस सोडण्यावरून टिटवाळाकरांमध्ये संताप

टिटवाळा (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाकडून (केडीएमटी) टिटवाळासाठी अनेकदा कमी क्षमतेच्या बसेस सोडण्यात येत असल्याने टिटवाळाकर संताप व्यक्त करीत आहेत. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत जादा प्रवासी क्षमतेच्या बस टिटवाळासाठी सोडण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

सकाळी नोकरी व्यवसाया निमित्त टिटवाळा येथून कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांची वाजपेयी चौकातील बस थांब्यावर मोठी गर्दी असते. येथून कल्याणसाठी राज्य परिवहनच्या बस देखील सुटत असल्या तरी त्यांची संख्या कमी असल्याने येथील प्रवाशांची सगळी मदार केडीएमटीच्या बसवर असते. तसेच सायंकाळी कल्याणच्या नेहरू चौकातून टिटवाळासाठी सुटणाऱ्या केडीएमटीच्या बसला देखील तशीच परिस्थिती असते. त्यातही कल्याणवरून टिटवाळासाठी सुटणारी शेवटची बस रात्री पावणेदहाच्या-दहाच्या सुमारास सुटत असल्याने त्यावेळी प्रवाशांची लांबच लांब रांग नेहरू चौकात लागलेली असते. ही रांग लावताना प्रवाशांना येथील फेरीवाले आणि रिक्षाचालकांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यातच शेवटच्या बसच्या वेळेस कमी प्रवासी क्षमतेच्या लहान बसेस अनेकदा सोडल्या जात असल्याने त्या बसमध्ये प्रवाशांना जनावरासारखे कोंबून भरले जाते. त्याउपरही प्रवासी बस बाहेर राहिल्यास त्यांना टिटवाळा येथे जाण्यासाठी रिक्षा शिवाय दुसरा पर्याय उरत नाही. मात्र शेअर रिक्षासाठी प्रती प्रवासी ७० रुपये आकारले जात असल्याने आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या टिटवाळाकरांची खुलेआम लुट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक रिक्षांमध्ये चार-चार, पाच-पाच अशा अतिरिक्त प्रवासी कोंबले जातात.

भरगच्च भरलेली केडीएमटीची टिटवाळा बस पुढे शहाड येथील बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना टाळून भरधाव पुढे हाकली जाते. यावेळी धावती बस पकडताना एखादा प्रवासी बस खाली सापडून गंभीर अपघात होऊ शकतो. यापेक्षा जादा बस अथवा जादा प्रवासी क्षमतेच्या बस शेवटच्या बसच्या वेळेत सोडण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.  

रात्री उशिरापर्यंत रेल्वे स्थानका समोरील नेहरू चौकात बेशिस्तपणे रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने बस, इतर मोठ्या वाहनांना, व पादचाऱ्यांना प्रवास करताना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. यातील बहुसंख्य रिक्षाचालक तोंडाला मास्क न लावता वावरत असल्याने प्रवासी व नागरिकांकडून कोरोनाच्या महामारीत आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विनामास्क वावरणाऱ्या रिक्षाचालकांना कोण आवर घालणार असा, सवाल सुजाण नागरीकांकडून केला जात आहे. करदात्या नागरिकांच्या पैशातून चालणाऱ्या केडीएमटी उपक्रमाने प्रवाशांना केंद्रबिंदू मानून त्यांना योग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आम जनतेकडून करण्यात येत आहे.