लांजा येथे रानभाजी बनविण्याच्या स्पर्धेत अंकिता गाडे प्रथम

लांजा येथे रानभाजी बनविण्याच्या स्पर्धेत अंकिता गाडे प्रथम

लांजा (प्रतिनिधी) :
लांजा तालुक्यातील व्हेळ येथे कोकणातील रानभाज्यांच्या पदार्थांची संपन्न झालेल्या स्पर्धेत अंकिता गाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

व्हेळ परिसरातील गावांमध्ये दररोजचा शेती-घर काम करणाऱ्या गृहिणींनी वेळ काढून या स्पर्धेत भाग घेतला. त्यांनी रानभाज्यांचे फारच चविष्ट व रुचकर पदार्थ बनवले. आपण मोठ्या शहरांमध्ये मॉल्स किंवा फूड हबमध्ये पाकीट बंद फ्रोझन फूड खातो. मात्र आज आलेला अनुभव अविस्मरणीय आहे. या स्पर्धेत रानातील जंगली फळ, भाजी व झाडांची पानांपासून पूर्ण ऑरगॅनिक असे पदार्थ बनवले होते. अळू वडी, कोथिंबीर भजी, सुरण भजी, खवल्याचा पराठा, कुर्डुची भाजी, टाकळ्याची भाजी, चौळीचा पानांची भाजी, अळू फदफद, खवला, करमारा, कुर्डु, टाकळ्याची भाकरवडी, खवल्याच्या पानांची इडली, अळू-टाकळा सामोसे, ओव्याचा पानांची भाजी इत्यादी भाज्या बनवण्यात आल्या होत्या.

स्पर्धेचे प्रमुख परीक्षक म्हणून फणसकिंग हरिश्चंद्र देसाई व कृषी भूषण पुरस्कार विजेते दिलीप नारकर हे उपस्थित होते. स्पर्धेचे निकाल काढताना परीक्षकांनी महिला स्पर्धकांनी कष्टपूर्वक बनविलेल्या या भाज्यांचे बारकाईने परीक्षण करून गुण दिले. त्यानुसार स्पर्धेचा प्रथम क्रमांक अंकिता गाडे, द्वितीय क्रमांक रोशनी पांचाळ व तृतीय क्रमांक मदीला पन्हाळेकर यांना मिळाला. कोकणातील दरीखोऱ्यांमध्ये, जिथे गावांमध्ये जाण्याचे रस्ते देखील नीट नाहीत अशा गावांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता सामावली असल्याचे निरीक्षण हरिश्चंद्र देसाई यांनी निकाल जाहीर करताना व्यक्त केले. स्पर्धेचे आयोजन करण्यात कृषिमित्र चिंतन कुऱ्हाडे, ऋषीकेश भिसे, कपिल कावले, उमेश हजारी, रुद्रेश भौड, आदित्य जाधव, शार्दूल नरवणकर, चिनार आरेकर, प्रतीक भुजबळ, सुनीत भोईर यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना कृषी विज्ञान केंद्र, लांजाचे समन्वयक हनुमंते व महाले यांनी मार्गदर्शन केले.