सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : 
‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या ६ महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे येत्या २० डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ हे ६ महिन्यांचे प्रशिक्षण वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते. २०१९-२०२० या वर्षातील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक १ जानेवारी ते ३० जून २०२० या ६ महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दरमहा ४५० रुपये तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीला दरमहा १०० रुपये इतके प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.

प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीचे वय १८ ते ३५ या दरम्यान असावे. पोहता येणे आवश्यक आहे. किमान ४ थी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक कार्डधारक किंवा आधारकार्डधारक असावा. संबंधित संस्थेच्या शिफारसीसह विहित परिपूर्ण अर्ज असावा. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधीत गट विकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक मच्छिमारांनी मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-६१ येथे दिनांक २० डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.