कोविडची बिल तपासणी व बेड उपलब्‍धतेसाठी ऑडीटर्सच्या नियुक्त्या

कोविडची बिल तपासणी व बेड उपलब्‍धतेसाठी ऑडीटर्सच्या नियुक्त्या

कल्याण (प्रतिनिधी) : शहरातील वाढत्या कोविड-१९ च्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २६ खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये शासनाच्‍या अधिसूचनेनुसार कोविड रुग्णांवर वाजवी दरात उपचार उपलब्‍ध व्‍हावेत, तसेच त्‍यांना विनासायास बेड उपलब्‍ध व्हावेत याकरिता ऑडीटर्सच्‍या नियुक्‍त्‍या करण्यात आली आहे.

कोविड-१९ साथीच्‍या काळात शासनाच्‍या अधिसूचनेनुसार खाजगी कोविड रूग्‍णालयांमध्‍ये कोविड रूग्‍णास वाजवी दरात उपचार उपलब्‍ध व्‍हावेत, तसेच त्‍यांना विनासायास बेड उपलब्‍ध व्‍हावा, यासाठी सबंधित रूग्‍णालयांमध्‍ये महापालिकेमार्फत ऑडीटर्सच्‍या नियुक्‍त्‍या करण्‍यात आल्‍या होत्‍या. मात्र कोविड-१९ची रूग्‍णसंख्‍या कमी झाल्‍यामुळे फेब्रुवारी-२०२१ मध्‍ये त्यांच्या नियुक्‍त्‍या रद्द करण्‍यात आल्‍या होत्‍या. परंतु महापालिका क्षेञातील वाढती रूग्‍णसंख्‍या पाहता कोरोनाबाधित रूग्‍णास खाजगी रूग्‍णालयात बेड उपलब्‍ध होणे, तसेच रूग्‍णांकडून शासनाच्‍या नेमून दिलेल्‍या दरानुसार बिलांची आकारणी होते की नाही, यावर नियंञण ठेवणेसाठी महापालिकेमार्फत पुनश्‍च २६ खाजगी कोविड रूग्‍णालयात ऑडीटर्सची नेमणूक करण्‍यात आल्या आहेत. 

सदर ऑडीटर्स हे संबंधित कोविड रूग्‍णालयामध्ये कोविड रुग्णांना डिस्‍चार्ज करतेवेळी त्यांना आकारलेल्‍या बिलांची शासन नियमांनुसार तपासणी करतील व जादा बिलाची आकारणी केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास रूग्‍णालयाच्‍या निदर्शनास आणून देतील व रूग्‍णास वाजवी बिले दिल्‍याबाबत खातरजमा करतील. महापालिकेने खाजगी कोविड रूग्‍णालयांमध्‍ये ऑडीटर्सची नेमणूक केल्‍यामुळे अवाजवी बिल आकारणीवर नियंञण येणार आहे.