केंद्रीय क्षयरोग  नियंत्रण विभागाकडून ठाणे महापालिकेचे कौतुक

केंद्रीय क्षयरोग  नियंत्रण विभागाकडून ठाणे महापालिकेचे कौतुक

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिका क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून नव्या ॲपची निर्मिती करण्यात येत असून लवकरच 'टीबीमुक्त ठाणे' हे ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवर रुग्णांना सर्व माहिती उपलब्ध होणार असून या ॲपचे कौतुक केंद्रीय क्षयरोग विभाग व जागतिक आरोग्य संघटनेचे भारताचे प्रतिनिधी  डॉ. मल्लीक परमार यांनी केले तसेच हे ॲप तयार करणारी ठाणे ही पहिली महापालिका असून याबाबत त्यांनी महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे कौतुक केले आहे.

महापौर दालनात झालेल्या या भेटीदरम्यान उपमहापौर पल्लवी कदम, नौपाडा कोपरी प्रभागसमिती अध्यक्षा नम्रता फाटक, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, नगरसेविका सुखदा मोरे, जयश्री डेव्हिड, उपायुक्त मनीष जोशी,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, डॉ. अल्पा दलाल आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१५ पर्यत संपूर्ण भारत हा क्षयरोगमुक्त होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत सूचित केले आहे. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने देखील ठाणे शहर क्षयरोगमुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. ठाणे महापालिका क्षयरोग आटोक्यात आणण्यासाठी राबवित असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी क्षयरोग नियंत्रण कक्षाचे केंद्रीय पथक व शासनाच्या आरोग्य विभागाच्या १० डॉक्टरांचे पथक देखील उपस्थित होते. या पथकाने ठाणे महापालिकेच्या क्षयरोग नियंत्रण कक्षास भेट देवून ठाणे महापालिकेने आतापर्यत राबविलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. 

यावेळी ठाणे महापालिकेतील शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रसाद पाटील व त्यांचे सहकारी तयार करीत असलेल्या 'टीबीमुक्त ठाणे' ॲपची माहिती सुद्धा घेतली. क्षयरोग रुग्णांसाठी तयार करण्यात येणाऱ्या ॲपच्या माध्यमातून रुग्णाची माहिती, त्यांच्यावर सुरू असलेले उपचार, रुग्ण घेत असलेली औषधे व त्यांचे सर्व रिपोर्टस् तसेच शासनाकडून क्षयरुग्णास पोषक आहारासाठी महिन्याला देण्यात येणारे ५०० रुपये याचीही माहिती एका क्लिकवर रुग्णास मोबाईलवर उपलब्ध होणार आहे., तसेच शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या सूचना व उपाययोजना याची देखील माहिती या ॲपवर रुग्णांना मिळणार असल्याचे डॉ. प्रसाद पाटील यांनी नमूद केले.

ठाणे महापालिका क्षयरोग्‍ रुग्णांसाठी राबवित असलेल्या उपाययोजनांबाबत केंद्रीय क्षयरोग विभाग व जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी डॉ. मल्लीक परमार व शासनाच्या आरोग्य विभागाच्या टीमने या ॲपचे कौतुक केले आहे. या भेटी दरम्यान त्यांनी ठामपाच्या विविध आरोग्य केंद्रांना, तसेच प्रत्यक्ष क्षयरुग्णांच्या घरी जावून भेटी घेऊन त्यांना ठामपातर्फे मिळणाऱ्या सेवेचा आढावा देखील घेतला. तसेच सन २०२५ पर्यत ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये क्षयरोग आटोक्यात आणण्यासाठी काही महत्वपूर्ण सूचना करुन त्यांची अंमलबजावणी करण्याबाबतही ठामपाच्या क्षयरोग विभागास सूचित केले.