कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुरवणी अंदाजपत्रकाला मान्यता

कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुरवणी अंदाजपत्रकाला मान्यता

कल्याण (प्रतिनिधी)  : 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या सभेमध्ये ९४ लाख १५ हजार रुपये खर्च व ४४ हजार ७१ रुपये उत्पन्न असणारे सन २०१९-२०२० च्या अंदाजपत्रकासाठी पुरवणी अंदाजपत्रक सादर केले.

बाजार समितीच्या ह्या पुरवणी अंदाज पत्रकात फी पोटी ४४ हजार ७१ रुपये उत्पन्न मिळण्याचे संकेत दिले असून सभा व भत्ता खर्च १ लाख ७५ हजार, आस्थापना खर्च ५९ लाख २५ हजाराच्या पोटी वेतन ७० लाख भत्ते ५२ लाख २५ हजार, प्रशासकीय खर्चा पोटी ३३ लाख १५ हजाराच्या तरतुदीमध्ये निवडणूक १९ लाख जाहिरात ३० हजार, स्वच्छता खर्चापोटी ३० हजार, इतर किरकोळ प्रशासकीय खर्चापोटी ३ लाख २० हजार, देखभाल दुरुस्ती व भेटी यावरील खर्चापोटी ७ लाख, विधी विभागावरील खर्चापोटी ३० हजाराच्या वाढीव खर्चाचा अंदाज आहे.

संचालकांनी ३१ ऑक्टोबरच्या सभेत मंजुरी देताना संचालक मयूर पाटील यांनी उत्पन्न ४४ हजार असता ९४ लाख खर्चाचा ताळमेळ कसा घालणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना प्रशासनाने उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करण्याचे सांगितले. सभेत समितीच्या कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यास संचालकांनी मान्यता दिली. समितीचा तोटा कोट्यावधी रुपयांचा असून तो कमी करण्याकामी प्रशासनाने प्रयत्न करावेत असा सल्ला सभापती थळे यांनी दिला.