अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी

अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या अखत्यारितील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आरसीएफ शाळा, लेक्चर हॉल, कुरुळ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नुकतीच दिली.

लवकरच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश प्रकिया सुरू होणार असून, रायगडसह कोकणातील विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी  यावेळी केले. रायगड जिल्ह्यात आरोग्य सुविधेच्या मूलभूत हक्कांपासून कोणीही वंचित राहणार नाही आणि त्यातून आरोग्य स्वयंपूर्ण रायगड वेगाने मार्गक्रमण करताना दिसून येणार आहे.

पालकमंत्री तटकरे म्हणाल्या की, जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अलिबाग येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक बांधकाम, यंत्रसामुग्री व पद निर्मितीस शासनाने  मान्यता प्रदान केली आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील मौजे ऊसर येथे एकूण ५२ एकर जमीन संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांना प्रदान करण्यात आली आहे.

सदर नियोजित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी यापूर्वी शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार आवश्यक पदनिर्मिती करण्यास उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अटही शिथील करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता पुढील चार वर्षात एकूण १ हजार ७२ पदांची निर्मिती करण्यास तसेच त्याकरिता येणाऱ्या रु.६१.६८ कोटी इतक्या अंदाजित खर्चास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंजूरी दिली आहे.