दहिवलीच्या जंगलात लावण्यात आले तब्बल १ हजार देशी वृक्ष

दहिवलीच्या जंगलात लावण्यात आले तब्बल १ हजार देशी वृक्ष

कल्याण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र वन विभाग आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा ठाणे, युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था आणि अंघोळीची गोळी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दहिवली येथे पिंपळ, जांभूळ, वड, बेहडा आदी देशी वृक्षांच्या तब्बल १ हजार रोपांचे रोपण करण्यात आले.  यासोबतच गुंज संस्था, वॉर रेस्क्यू फाउंडेशन तसेच स्थानिक गावकरी आणि लहान मुले यांची मोलाची साथ यावेळी मिळाली. या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत एक हजार रोपे पुरविण्यात आली.

महा. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांनी संपूर्ण जगाला हवामान बदल, तापमान वाढ, पर्यावरण असमतोलामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी वृक्षारोपणासारख्या उपक्रमांची भरीव गरज विशद करून पर्यावरण संवर्धनाच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले. अंघोळीची गोळी संस्थेचे सचिव अविनाश पाटील यांनी केवळ झाडे लावून चालणार नाहीत तर त्यांचे संगोपन देखील करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडले.

या कार्यक्रमाला महा. अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेखा भापकर, उत्तम जोगदंड, ऍड. तृप्ती पाटील, जिल्हा प्रधान सचिव निशिकांत विचारे, किशोर पाटील, युवा संस्कारचे सोमनाथ राऊत तसेच, वनविभागाचे परिमंडळ अधिकारी आर. एन. गोरले, वनरक्षक एम. जी. होलगीर, वनरक्षक एम. व्ही. सावंत, गुंज संस्थेचे राहुल सर, दहिवली गावाच्या सरपंच निर्मला सावंत त्याचबरोबर कमलाकर राऊत, जयवंत मिरकुटे व अंनिसचे शाखा - जिल्हा पातळीवरील  बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

वृक्षारोपणाच्या उपक्रमात गावकरी आणि लहान मुले यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात लहान मुलांनी स्वागतगीत गाऊन केली यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले व सोमनाथ राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.