मनसेच्या आमदारांनी केलेले एक तरी विकास काम दाखवावे; सेनेचे आव्हान

मनसेच्या आमदारांनी केलेले एक तरी विकास काम दाखवावे; सेनेचे आव्हान

डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली येथील मानपाडा रस्त्याच्या मंजूर निधीवरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेत कडाडून टिका केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेली किती तरी विकासकामे जनता पहात असून आमदार राजू पाटील यांनी आपले किमान एकतरी केलेले विकासकाम दाखवावे, असे जाहीर आव्हान शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले. पूर्वेकडील मानपाडा रोडवरील होरायझन सभागृहात शिवसेनेतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 

याप्रसंगी डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, युवासेना अधिकारी दिपेश म्हात्रे, राजेश कदम, तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे, एकनाथ पाटील, योगेश म्हात्रे आदी उपस्थित होते. यावेळी थरवळ पुढे म्हणाले, सरकारी लाखोट्यात विरोधक खाडाखोड करून मीच पाठपुरावा केला असे सांगतात, पण अशी खोडखोड केल्याप्रकरणी आम्ही तक्रार करणार असे ते म्हणाले. आधी केले नंतर सांगितले ही शिवसेनेची भूमिका आहे.  माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ४७१ कोटी रुपये निधीच्या रस्ते होणारं म्हणून भूमिपूजन केले होते, पण प्रत्यक्षात चार कोटींची कामे झाली नाही. काहींना हौस असते मीच मीच केलं असं सांगण्याची, अशी टीका त्यांनी आमदारांवर केली.

शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले की, येथील लोकप्रतिनिधी आपल्या नावाने श्रेय घेत आहे ते योग्य नाही, मी केलं मी केलं हे बरोबर नाही. सुरुवातीला प्रकाश म्हात्रे म्हणाले, कामे केली की जनता लक्षात ठेवते. आम्ही श्रेयासाठी काम करीत नाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विकास कामांसाठी पाठपुरावा करून ३६० कोटींचा निधी आणला आहे. २७ कोटी निधीवरून कोणी एकट्याने निधी आणला नसून, शासनानेही दोघांच्यामुळे हे काम होत आहे असे स्पष्ट केले आहे. त्याबाबतची प्रत प्रकाश म्हात्रे यांनी पत्रकारांना दाखवली. पण त्यात एडिट करून फक्त मनसे आमदारांनी स्वतःच नांव दाखवले, असा आरोप म्हात्रे यांनी केला. आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी एक तरी काम स्वतःच्या ताकदीने आणलं आहे का, असा सवाल त्यांनी केला. 

रमेश म्हात्रे यांनी मनसे आमदार पाटील हे निष्क्रिय आमदार असल्याचा टोला लगावला. ते पुढे म्हणाले, आज कोरोना परिस्थिती आहे म्हणून आमदार  पाटील डोंबिवलीत  दिसत आहेत नाहीतर ते देशाबाहेर असते.  यावेळी दीपेश म्हात्रे यांनी, आमदार राजू पाटील व रवींद्र चव्हाण हे कोविड सेंटर बंद करा म्हणून मागणी करीत होते. मात्र त्यानंतर दुसरी लाट आली तेव्हा ते कुठे होते. सिमेंट काँक्रीट रोडसाठी मंजुरी नव्हती मग भूमीपूजन कशी केलीत, असा सवाल केला.