कचरा कर प्रकरणी राजकीय पक्षांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न- श्रीनिवास घाणेकर

कचरा कर प्रकरणी राजकीय पक्षांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न- श्रीनिवास घाणेकर

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांवर कचऱ्यांचा सहाशे रुपये लावण्यात आलेला करा संदर्भात आक्षेप नोंदवित धोरण निश्चित करण्याबाबत मागणी केली होती. याचे श्रेय एक राजकीय पक्ष लाटत असल्याची माहिती कल्याण मधील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दिली आहे. एका राजकीय पक्षाने या कराबाबत आपलीच भूमिका रेटून नागरिकांचा दिशाभूल करण्याचा प्रयास सुरू केला, मात्र त्यांच्या राजकीय सोयीनुसार आंदोलन मात्र पार पडू शकले नसल्याचे घाणेकर यांनी स्पष्ट केले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचऱ्यावर सहाशे रुपयांचा अतिरिक्त कर लादला असून यासंदर्भात घाणेकर यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना पत्र देत नागरिकांनी आपल्या घरच्या ओल्या कचऱ्याचे निवारण स्वतः केल्यास किंवा करत आहेत अशा व्यक्तींना कचरा व्यवस्थापन कराचे सहाशे रुपये माफ करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच एक रकमी कर भरल्यास पाच टक्के सवलत द्यायची तर दुसर्‍या बाजूस ६०० रुपये कर व्यवस्थापन कर लादायचा असा सर्व खटाटोप पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. यास आपण कडाडून विरोध केला असल्याचे त्यांनी सांगितले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी निवेदनाची गंभीरतेने दखल घेतली असून व्यवस्थापन कराबाबतचे धोरण महापालिका स्तरावर विचारधीन असल्याचे म्हटले आहे. घनकचरा व्यवस्थापनाने असे धोरण अवलंबिल्याने विविध राजकीय पक्ष श्रेय लाटण्यासाठी सरसावतील याबाबतचा खेळखंडोबा राजकीय पुढाऱ्यांनी तूर्त बंद करावा, अशी पुष्टीही माहिती घाणेकर यांनी पुढे जोडली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील राहत असणाऱ्या नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आपण उपस्थित करून तसे निवेदनही प्रशासनाला दिले होते. या निवेदनाची दखल घेत करा संदर्भात प्रशासन तोडगा काढणार आहे. ६०० रुपये कचऱ्यावर कर लावल्याने आपण उपस्थित केलेल्या मुद्यांवर एका राजकीय पक्षाने निव्वळ स्टंटबाजी सुरु केल्याची टीका श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे.