सिंधुदुर्गात वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाई रकमेत वाढ करण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्गात वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाई रकमेत वाढ करण्याचा प्रयत्न

मुंबई (प्रतिनिधी) : 
वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानभरपाईमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने डॉ. बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस गृहराज्यमंत्री (ग्रामीण) तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह कृषी विभाग, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माकडांमुळे नारळाच्या फळांचे मोठे नुकसान होते. तसेच दक्षिणेकडील काही भागात हत्तींचा उपद्रव होतो. याशिवाय गवा तसेच अन्य वन्यप्राणीदेखील पिकांच्या नुकसानीला कारणीभूत ठरतात. सध्याची नुकसान भरपाईची रक्कम कमी आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. 

यावेळी डॉ. बोंडे यांनी निर्देश दिले की, नुकसान भरपाईचे निकष सुधारित करुन भरपाईच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याची शिफारस वनविभागाकडे करण्यात यावी. तसेच वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने प्रयोग करुन उपाययोजना सुचविण्याबाबत निर्देश द्यावेत. ते प्रयोग यशस्वी ठरल्यास पीक संरक्षणाच्यादृष्टीने योजना तयार करता येईल.