रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'कडून दखल

रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'कडून दखल

रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोरोना महामारी काळात जिल्ह्यात गावं दत्तक घेऊन संसर्ग रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न, पोलिस कर्मचारी, कुटुंबीयांसाठी शिबिरे, स्वतंत्र कोविड सेंटर उभारणे, त्याप्रमाणेच जुलैच्या महापुरामध्ये पोलिस दलाने सर्वांत प्रथम पोहचून केलेली मदत अशा कामांतील रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या या उल्लेखनीय आणि सामाजिक कार्याची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'ने दखल घेत त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे.

रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून गर्ग यांनी पदभार घेतल्यानंतर यंत्रणेला वेगळी शिस्त त्यांनी लावली. कोरोना महामारीमध्ये पोलीस दलाने कौतुकास्पद काम केले. आरोग्य विभाग, प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलली. जास्त संसर्ग असलेली गावे पोलीस दलाने दत्तक घेतली. तेथे प्रभावी काम करून संसर्ग रोखण्यात ते यशस्वी झाले. पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनापासून लांब ठेवण्यासाठी मेडीकल कीट पुरवणे, पोलिस कर्मचारी आणि कुटुंबीयांसाठी स्वतंत्र आणि आधुनिक कोविड सेंटरही सुरू केले.

चिपळूण, खेड, राजापुरात २२ जुलैला महापुराने थैमान घातले. या पूरस्थितीमुळे हजारो कुटुंबांचे संसार पाण्याखाली गेले होते. अशावेळी मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस सर्वप्रथम चिपळुणात पोहचले. कोरोना रुग्ण वा इतर नातेवाईक यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले. कोरोना काळात गावागावात बैठका घेऊन पोलिसांनी जनजागृती केली. डॉ. गर्ग यांचे कोरोना महामारी आणि महापुरामध्ये पोलिस दलाने सामाजिक भान ठेवून केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल महाराष्ट्रानेच नव्हे तर वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्ड्स लंडन या संस्थेने घेतली. संस्थेने डॉ. गर्ग यांना नुकतेच प्रमाणपत्र मेल करून त्याच्या कामाचे कौतुक केले.