सिंधुदुर्गच्या  कृषी विज्ञान केंद्राला उत्तम सादरीकरणाचे पारितोषिक

सिंधुदुर्गच्या  कृषी विज्ञान केंद्राला उत्तम सादरीकरणाचे पारितोषिक

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 
भारतीय कृषी संशोधन परिषद (नवी दिल्ली), आयसीएआर (अटारी, पुणे) व केंद्रीय सागरी कृषी संशोधन संस्था (ओल्ड गोवा) यांचे मार्फत दोन दिवसीय कृषी विज्ञान केंद्रांची वार्षिक आढावा व प्रगती विश्लेषण कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी सिंधुदुर्ग (ओरोस) येथील कृषी विज्ञान केंद्राने मागील वर्षभरात केलेल्या कार्याचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याने केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मंदार गीते यांचा मान्यवरांच्या हस्ते उत्तम सादरीकरणाचा पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला.

या कार्यशाळेस बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, दांतेवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक पटेल, निवृत्त सहसंचालक डॉ. व्ही. पी. पटेल, आयसीएआरचे (नवी दिल्ली) उपसंचालक डॉ. पी. दास, उपसंचालक डॉ. अशोक कुमार सिंग, आयसीएआरचे (पुणे) संचालक डॉ. लखन सिंग यांच्यासह विविध विद्यापीठांचे आठ कृषी विस्तार संचालक उपस्थित होते. या कार्यशाळेत महाराष्ट्र, गुजरात व गोवा येथील कृषी विज्ञान केंद्रांच्या वार्षिक आढावा व प्रगती विश्लेषण करण्यात आले.

यावेळी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, ग्रामीण युवक हा कोकणातच कसा थांबेल व शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून चार पैसे कसे कमावेल याकडे कृषी विज्ञान केंद्रांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. तसेच भविष्यात शेती उत्पादन कंपन्या स्थापन करण्यावर देखील कृषी विज्ञान केंद्रांनी भर द्यावा व मार्केटिंग वर अधिक लक्ष द्यावे अशी आग्रही सूचना त्यांनी केली.

सदर कार्यशाळेत ७९ कृषी विज्ञान केंद्राची सादरीकरणे व प्रगती अहवाल यांचा तज्ञांच्या देखरेखीखाली सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी सिंधुदुर्गच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मंदार हरिश्चंद्र गीते, यांनी कृषी विज्ञान केंद्रातर्फे मागील वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा आपल्या सादरीकरणात संक्षिप्तपणे सादर केला. कृषी तंत्रज्ञान, जातीचा प्रभाव, विस्तार प्रणाली, कृषी संदेश प्रणाली, शेतकऱ्यांच्या शेतावरील चाचण्या, आद्यारेषा प्रात्याक्षिके, आंतरराज्य प्रशिक्षणे, आंतरराज्य सहली, विविध वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान, यशोगाथा इत्यादीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. मान्यवरांनी उपस्थित केलेल्या शंकांचे सविस्तर माहिती देऊन गीते यांनी निरसन केले. त्यांच्या सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक केले. त्यांना डॉ. पी. दास, डॉ. अशोक कुमार सिंग व डॉ. लखन सिंग यांच्या हस्ते उत्तम सादरीकरणाचा पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. कोकण विभागात सिंधुदुर्गचे काम उत्कृष्ट असल्याचा अभिप्राय देत मान्यवरांनी त्यांना जैवविविधता सांभाळून नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचे सुचविले.