कल्याण येथे विद्यार्थ्यांची पथनाट्याद्वारे मतदानासाठी जनजागृती

कल्याण येथे विद्यार्थ्यांची पथनाट्याद्वारे मतदानासाठी जनजागृती

कल्याण (प्रतिनिधी) : 
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्क्यात वाढ करण्यासाठी कल्याण शहरात ठिकठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मतदानासाठी जनजागृती करण्याचे अभियान राबविले आहे.

कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक शाळेच्या वतीने हे अभियान राबविण्यात आले. त्यासाठी पथनाट्य पोस्टर्स-बॅनर्सद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. विधानसभा १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत भांडे पाटील, शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, नोडल अधिकारी वसंत भोंगाडे, भागाजी  भांगरे, सहाय्यक नोडल अधिकारी एल. के. पाटील शाळेचे शिक्षक गणेश पाटील, संध्या पाटील, ओमप्रकाश धनविजय, संजय राठोड, गणेश पालांडे यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रातील तीसगाव नाका, चक्कीनाका अशा चौकाचौकात पथनाट्य सादर करण्यात आले. 

तसेच पश्चिमेतील अत्रे रंगमंदिर येथे दिव्यांग नागरिकांसमोर प्रभारी उपायुक्त प्रकाश ढोले यांच्या उपस्थितीत तर महानगरपालिका, शिवाजी चौक येथे पथनाट्य सादर केले. गणेश पाटील यांनी मतदार जनजागृतीवर लिहिलेला जोगवा या पथनाट्यातून सादर केला. पथनाट्य सादर करणारे विद्यार्थी प्रशिक,  प्रज्ञा, मनस्वी, सेजल, वंशिका स्नेहा, सिंचल, ऋतुजा, कृष्णा, आर्यन, प्रेम, समर्पण, सिध्दार्थ, आदित्य, अभिजीत, प्रणव, तेजस इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

वासुदेवासह विद्यार्थी  विविध जाती-धर्माच्या वेशभूषेत असल्याने नागरिकांचे आकर्षण होतं नागरिक गर्दी करून पथनाट्य याचा आनंद घेत होते. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने मतदार जनजागृतीकरिता पथनाट्याद्वारे नागरिकांना हाक देण्यात आली. आमच्या शाळेत वर्गप्रतिनिधी निवडतांना शासकीय पध्दतीने जशी निवडणूक घेतली जाते त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी निवडला जातो असे सांगितले.