मराठ्यांमध्ये अयातुल्ला खोमेनी तयार झाला पाहिजे- अरविंद मोरे

मराठ्यांमध्ये अयातुल्ला खोमेनी तयार झाला पाहिजे- अरविंद मोरे

नाशिक (प्रतिनिधी) : मराठ्यांमध्ये हिटलर तयार झाला पाहिजे, अयातुल्ला खोमेनी तयार झाला पाहिजे. याचे कारण मराठ्यांचे नेतृत्व मराठ्याने केले पाहिजे तो कुठल्याही पक्षाचा नसावा. मराठ्यांवर ज्या ज्या वेळी अन्याय-अत्याचार होईल, त्या त्यावेळी जो भांडेल तोच मराठ्यांचा नेता असेल. आम्ही आरक्षणाची भिक मागत नाही. आम्हाला नाही तर कुणालाच नाही, ही आमची स्पष्ट भूमिका असल्याचे मत मराठा सेनेचे प्रदेश अध्यक्ष अरविंद मोरे यांनी देवळाली येथील बटरफ्लाय गार्डन येथे नुकत्याच संपन्न झालेल्या संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

यावेळी मोरे पुढे म्हणाले की, एका आदेशान्वये ओबीसींना आरक्षण देण्यात आले. दुसरीकडे मराठा नेते सांगतात आम्ही कुणाचाही घास काढून घेणार नाही. हे सत्य असले तरी आम्ही आमचा हक्क-अधिकार मिळवण्यासाठी कोणाच्याही अंगावर जावू शकतो, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. राज्य सरकारने गायकवाड आयोग नेमून मराठ्यांना मागासवर्गीय घोषित केले. तसे माळी, वाणी, वंजारी समाजाला मागासवर्गीय आयोग न नेमता त्यांना ओबीसी आरक्षण देण्यात आले. मराठा समाजाला कायद्यानुसार गायकवाड आयोग नेमून मागासवर्गीय ठरवण्यात आले. त्यानुसार आम्ही मागास असताना मराठा ओबीसीत का जाऊ शकत नाही, असा सवाल करीत मोरे यांनी राज्य सरकार-केंद्र सरकार दुटप्पी भूमिका घेत असेल तर त्याचा निषेध करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर मराठा सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष धनंजय जोगदंड, प्रदेश संघटक रविंद्र कदम, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा मीना पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष राजाराम शिंदे, कल्याण शहर अध्यक्ष निलेश भोर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील महिला उद्योजीकांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. मीना पाटील यांचा वाढदिवस याप्रसंगी साजरा करण्यात आला व संघटनेच्या वतीने  त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.